Devdatta Nage: 'देवयानी', 'जय मल्हार' यांसारख्या मालिकांमधून अभिनेता देवदत्त नागे (Devdatta Nage) घराघरात पोहोचला. या मालिकांमुळे त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली. बलदंड शरीर, नम्र आणि कष्टाळू असलेला हा अभिनेत्याने आता हिंदीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही आपली छाप उमटवली आहे. 'देवकीनंदन वसुदेवा' आणि 'रॉबिन हूड' या साउथ सिनेमांमध्ये त्याने खलनायकाच्या भूमिका साकारून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. परंतु देवदत्त नागे मराठी सिनेमांमध्ये फारसा दिसला नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने यावर भाष्य केलं आहे.
नुकतीच देवदत्त नागेने अमोल परचुरे यांच्या 'कॅचअप' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने त्याच्या मनातील खंत व्यक्त करत म्हणाला, "मी एक संघर्ष नावाचा चित्रपट केला. त्यामध्ये आम्ही तीन हिरो होतो. त्यातील माझे काही सीन्स कट करण्यात आले होते. खूप चांगले भावनिक सीन्स होते. त्यामुळे मला थोडं वाईट वाटलं. मी जसे अॅक्शन सीन करतो तसेच भावनिक सीन देखील तेवढ्याच ताकदीने देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर मग मराठी चित्रपट झाला नाही. आपल्या मराठी चित्रपटांची प्रतिभा खूप मोठी आहे. आज आपले 'श्वास'सारखे प्रोजेक्ट्स ऑस्करपर्यंत जातात. ही एवढी प्रतिभा आपली आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ग्रॅज्यूएशनपेक्षा पीएचडी करायला पाहिजे. आपल्या इथले जे मराठी निर्माते आहेत त्यांना कदाचित मी सातवी-आठवीत आहे, असं वाटतं. खरंच मी अजून तिथेच आहे. पण, मी तिथपर्यंत पोहोचेन आणि सांगेन की मला सिनेमात घ्या किंवा कदाचित त्यांना मी परवडत नसेन."
त्यानंतर अभिनेता म्हणाला, "मानधन हा विषय महत्वाचा असतोच पण एखादा चांगला विषय असेल तर या गोष्टी बाजूला ठेवणं गरजेचं आहे. मला खरंच असं वाटतं की, बॉलिवूडकडून ऑफर्स येतात त्यातील काही ऑफर्स स्विकारतो तर काहींना नकार देतो. शेवटी जी जबाबदारी प्रेक्षकांनी माझ्या खांद्यावर दिली आहे त्या सगळ्या गोष्टींना धरुनच ऑफर्स स्विकारली जाते आणि नाकारली जाते. मला ही खंत आहे." असं अभिनेत्यांने सांगितलं.