Dr. Amol Kolhe Video: पडद्यावर ऐतिहासिक भूमिका साकारणे, राजकारणात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे डॉ. अमोल कोल्हे पेशाने डॉक्टर आहेत. एक डॉक्टर, त्यानंतर अभिनय क्षेत्रातील दमदार कामगिरी आणि खासदार हा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. डॉ. अमोल कोल्हे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे झाला. त्यांनी पुण्यातच बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर मुंबईत एमबीबीएसचं शिक्षण घेतलं.
सेठ गोवर्धनदास सुंदरदास (जी.एस.) महाविद्यालयातून एमबीबीएस झाल्यानंतर त्यांनी काळात पुण्यात डॉक्टर म्हणून प्रॅक्टिसही केली. अर्थात या पेशात त्यांचं मन रमेना. अभिनयाची आवड उपजत होती, मग त्यांनी तिचं आवड जोपासली. त्यांनी अनेक मालिका आणि नाटकांमधून काम केलं. झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं. कालांतराने राजकारणातही त्यांची धडाकेबाज एन्ट्री झाली. सध्या राजकारण आणि अभिनय अशा दोन्ही ठिकाणी ते जोमानं काम करताहेत. तूर्तास त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अमोल कोल्हे पुन्हा डॉक्टरकीकडे वळले की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
अमोल कोल्हे यांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते X-Ray तपासताना दिसत आहेत. डॉ. अमोल कोल्हेंचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात ते एक्सरे चेक करताना दिसत आहेत. नेमका हा व्हिडीओ पाहून अमोल कोल्हे यांनी पुन्हा प्रॅक्टीस सुरू केलीये, अशी चर्चा सुरू झालीये. अर्थात असं काहीही नाहीये.
काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांचे मानेला पट्टा बांधलेले फोटो व्हायरल झाले होते. तर कदाचित तेच दुखणं असावं. व्हिडीओत अमोल कोल्हे स्वत:चेच MRI रिपोर्ट चेक करत आहेत. व्हिडीओला त्यांनी मजेशीर कॅप्शनही दिलं आहे. ''दुखावलेली मान सांभाळत MBBS मध्ये शिकलेलं काही आठवतंय का याची खात्री करून पाहिली स्वतःचे MRI रिपोर्टस पाहून ( शेवटचा पर्याय आहेच- रेडिॲालॅाजिस्ट ने दिलेला रिपोर्ट वाचणे), असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय.
स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेने डॉ. अमोल कोल्हे यांचा प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. अनेक ऐतिहासिक भूमिका साकारल्यामुळे नागरिकांनी त्यांना अपार प्रेम दिलं. याच लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत, अमोल कोल्हे यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली. 2019 मध्ये महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ 4 खासदार निवडून आले. यामध्ये अमोल कोल्हे यांचा समावेश आहे.