Hardeek Joshi And Akshaya Deodhar Wedding : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला राणादा आणि त्याची पाठकबाई लग्नगाठ बांधत आहेत. होय, आम्ही बोलतोय ते अभिनेता हार्दिक जोशी ( Hardeek Joshi) व अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) यांच्याबद्दल. अक्षयाच्या हातांवर हार्दिकच्या नावाची मेहंदी सजलीये. आता प्रतीक्षा आहे तर फक्त शुभमंगल सावधान.... या शब्दांची. अक्षया व हार्दिकच्या लग्नाचे फोटो पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. पण तत्पूर्वी या जोडप्याची लव्हस्टोरी कशी सुरू झाली? कोणी कोणाला प्रपोज केलं? कोणी लग्नासाठी विचारलं? हे तुम्हाला ठाऊक आहे का? तर आज आम्ही याबद्दलच सांगणार आहोत.
अक्षया व हार्दिकची लव्हस्टोरी चांगलीच इंटरेस्टिंग आहे. खरंतर ही लव्हस्टोर सुरू झाली ती हार्दिकच्या आईच्या हट्टामुळे. विश्वास बसत नाहीये ना? पण हे खरं आहे. खुद्द हार्दिकने एका कार्यक्रमात हा खुलासा केला होता. लव्हस्टोरी कशी सुरू झाली, साखरपुडा कसा झाला? हे त्याने ‘बस बाई बस’ या शोमध्ये अगदी रंगवून रंगवून सांगितलं होतं. माझ्या डोक्यात खरंच असा काहीही विचार नव्हता...होय, वाचताय ते खरं आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेदरम्यान हार्दिकच्या मनात अक्षयाबद्दल तसा काही विचार नव्हताच. तो म्हणाला होता, ‘तुझ्यात जीव रंगला’ मध्ये आम्ही पाच वर्षे एकत्र काम केलं. त्यामुळे अक्षया व मी आम्ही दोघं चांगले मित्र झालो होतो. पण प्रेम, साखरपुडा हे सगळं मालिकेनंतरच जुळून आलं. माझ्या डोक्यात याबद्दल कधीही विचार नव्हता. पण माझी आई सारखी तिला विचारायची... अर्थात हे मला नंतर कळलं...
माझी आई सारखी तिला विचारायची... मला तू आवडतेस, असं माझी आई सारखं सारखं अक्षयला म्हणायची. इतकंच नाही तर तुला काय वाटतंय? असं ती अक्षयाला ती अनेकदा विचारायची. अक्षया हसून सोडून द्यायची. याचदरम्यान आई अनेकदा माझ्या मागेही लग्नासाठी तगादा लावायची. तू आता परत एखादी मालिका करशील, चित्रपट करशील. आता लग्नाचा विचार कर. तुझं वय निघून चाललं आहे, असं आईचं सतत सुरू असायचं आणि हो गं, बघू... असं म्हणून मी सोडून द्यायचो.
एकदा विचारून बघ ना...एक दिवस मात्र माझ्या आईनं कमालचं केली. एकदा विचारुन बघ ना. मी तसंही तिला एकदा विचारलं आहे. तू जरा परत विचारुन बघ, असं ती मला म्हणाली. मी अवाक् झालो होतो. मी तिला समजावलं. अगं आई,मी विचारलं ना तर ती माझ्याशी जेवढं बोलते तेवढंही बोलणार नाही. तेही बंद करेल. प्लीझ नको..., असं मी म्हणालो. त्यावर आई हट्टालाच पेटली. अरे प्लीज विचारून बघ ना, म्हणून मागेच लागली. अखेर आईच्या इच्छेखातर, एकदा विचारूनच बघू, असा विचार मी केला. मग मी तिला थेट जाऊन विचारलंच. माझ्या आईची इच्छा आहे की आपण लग्न करावं. तर तुझं काय मत आहे? असं मी तिला थेटच बोललो. यावर ठीक आहे, फक्त एकदा घरी बोल. मला काहीही प्रॉब्लेम नाहीये, असं अक्षया म्हणाली. त्यानंतर मी तिच्या घरी जाऊन बोललो. तेव्हा लग्नाचा काहीही विचार केला नव्हता. त्यावर ठिक आहे आम्ही विचार करुन सांगतो, असं त्यांनी म्हटलं आणि त्यानंतर थेट सहा महिन्यांनी तारखाच सांगितल्या. मी माझ्या नव्या मालिकेचं शूटींग करत होतो. अचानक मला अक्षयाने फोन केला. तू मेसेज वाचला का? फोटो बघितलास का? असं तिने मला विचारलं. मी मॅसेज बघितला तर, त्यावर 1,2,3 आणि 27,28 अशा तारखा लिहिल्या होत्या. त्या साखरपुड्यासाठी काढलेल्या तारखा होत्या. बरं हे सर्व मला 20 तारखेला समजलं. म्हणजे पुढच्या दहा दिवसात साखरपुडा करायचा, असं ते सर्व झालं. त्यात अक्षयाची इच्छा होती की तिच्या वाढदिवसाला साखरपुडा करायचा. तिचा जन्म अक्षय तृतीयाचा आहे. म्हणून मग 3 मे रोजी साखरपुडा केला...
तर मी विचारलंच नसतं...आईने हट्ट केला नसता तर अक्षयाला कधी विचारलंच नसतं का? असं हार्दिकला विचारल्यावर, त्याने अगदी साधेपणानं ‘नाही’ असं उत्तर दिलं होतं. माझ्यात तेवढी हिंमत नाही. माझ्या राणातले तेवढे गुण आहेत, असं हार्दिक म्हणाला होता.