Join us

"नसिरुद्दिन शाह यांनी मला बघितलं आणि...", किरण मानेंनी सांगितला 'तो' किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझा हात पकडून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 11:29 AM

नसिरुद्दीन शाह यांच्या भेटीचा अनुभव किरण मानेंनी या पोस्टमधून सांगितला आहे. एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान किरण माने यांनी नसिरुद्दीन शाह यांची भेट घेतली होती. याबाबत त्यांनी पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने हा मराठी टेलिव्हिजनचा लाडका चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या किरण मानेंना 'मुलगी झाली हो' या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. त्यांचा चाहता वर्ग मोठा असून सोशल मीडियावरही ते प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा किरण माने पोस्टमधून करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांना देत असतात. नुकतंच त्यांनी सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्याबाबत एक पोस्ट लिहिली आहे. 

नसिरुद्दीन शाह यांच्या भेटीचा अनुभव किरण मानेंनी या पोस्टमधून सांगितला आहे. एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान किरण माने यांनी नसिरुद्दीन शाह यांची भेट घेतली होती. याबाबत त्यांनी पोस्ट शेअर केली आहे. 

किरण मानेंची नसिरुद्दीन शाह यांच्याबाबत पोस्ट

मी स्वप्नातबी विचार केला नव्हता की कधीतरी द ग्रेट नसिरुद्दीन शाह यांच्या समोरासमोर उभा राहून नाटक आणि अभिनय याविषयी गप्पा मारेन. पण ते घडलं!

 

पाचसहा वर्षांपूर्वी एन.सी.पी.ए.मध्ये त्यांचं 'द फादर' नाटक बघायला गेलो होतो. नाटक आणि त्यांचा अफलातून अभिनय पाहून लै म्हणजे लैच भारावून गेलो होतो. पूर्वी कधीतरी त्यांच्या मुलाखतीत वाचलं होतं की ते नाटकाच्या प्रयोगानंतर कुणाला भेटत नाहीत. एनसीपीएच्या उच्चभ्रू प्रेक्षकांनीही ते वाचलं असावं त्यामुळे भारावलेले सगळेजण नाटक संपल्यावर हळूहळू कुजबुजत घरी निघून चालले होते. 

मला मात्र रहावेना. म्हटलं, च्यायला सातारहून आपण हे नाटक बघायला आलोय. या महान अभिनेत्याला आपण भेटलो नाही तर काय अर्थय? धाडस करून घुसलो बॅकस्टेजला. मेकअप रूममधून नसिरभाईंनी मला बघितलं आणि अचानक हसत-हसत माझ्या दिशेला आले. मी सटपटलो. वाटलं जवळ येऊन मुस्काटात मारू नये म्हणजे झालं. मी हात जोडून नमस्कार केला आणि नम्रपणे नाटकाच्या प्रयोगाविषयी बोलायला सुरूवात केली. ते मन लावून ऐकू लागले. मगू माझी भिड जरा चेपली. बोलता-बोलता मी त्यांच्या अभिनयातल्या काही बारकाव्यांवर बोलायचं धाडस केलं. अचानक नसिरभाईंनी नकळत माझा हात हातात घेतला. खूप वेळ तसाच पकडून ठेवला...

मला मनापासून असं वाटत होतं, की त्या स्पर्शातनं खूप काही 'पास' होऊन माझ्यात यावं !!

मी खूप वेळ बोलत राहिलो. त्या दारातनं माझ्या मागोमाग पनवेलच्या एका नाटकाच्या ग्रुपमधली काही पोरं घुसली होती. त्यांच्यातल्या कुणीतरी हे फोटोज काढले. मला बाहेर आल्यावर ती पोरं भेटली. म्हणाली, "तुम्हाला मेकअपरूमकडे जाताना पाहिलं आणि आम्ही ओळखलं की किरण माने नसिरजींना भेटूनच जाणार. मग आम्हीही मागं आलो."

त्या पोरांमुळं ही आठवण कॅमेर्‍यात कैद झाली...

लब्यू नसिरभाई ❤️

सध्या किरण माने 'तिकळी' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या मालिकेत ते खलनायकाच्या भूमिकेत आहेत. लवकरच ते कलर्स मराठीवरील 'लय आवडतेस तू मला' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या मालिकेत ते अप्पा धुमाळ ही भूमिका साकारणार आहेत. 

टॅग्स :किरण मानेनसिरुद्दीन शाहसेलिब्रिटी