मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता किरण माने सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहेत. त्यामुळे कलाविश्वापासून समाजापर्यंत कोणतीही एखादी घटना घडली की त्यावर उघडपणे ते भाष्य करतात. त्यामुळे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ते कायम चर्चेत येत असतात. सध्या सोशल मीडियावर त्यांची अशीच एक पोस्ट चर्चेत आली आहे. संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग शेअर करत त्यांनी सध्यस्थितीवर भाष्य केलं आहे.
काय आहे किरण मानेंची पोस्ट?
'सेक्सची भूक'... ही गोष्ट लै खत्तरनाक भावांनो ! त्या नादात मानूस एकदा का घसरला की भल्याभल्यांचं माकड होतं.. एकवेळ 'बाटली'तनं मानूस सहज भायेर पडंल, पन बाईच्या मोहाच्या 'पिंजर्यात' अडकला की त्याच्या 'नशिबानं थट्टा मांडली'च म्हनून समजा.हे लक्षात घेऊनच आपल्या तुकोबारायावर खार खाऊन असलेल्या विरोधकांनी त्याच्या बदनामीसाठी 'हनी ट्रॅप' लावलावता भावांनो.. पन चारीत्र्यवान तुकोबारायानं त्या बाईला आदरानं दूर करत असा उपदेश केला की तीसुद्धा या विचारांनी भारावून गेली.. अंतर्बाह्य बदलून गेली !आपले तुकोबाराया त्या बाईला म्हन्ले :पराविया नारी रखुमाईसमान । हें गेलें नेमून ठायींचें चि ।।जांई वो तूं माते न करीं सायास । आम्ही विष्णुदास नव्हों तैसे ।।न साहावें मज तुझें हें पतन । नकों हें वचन दुष्ट वदों ।।तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार । तरी काय नर थोडे जाले ।।आम्ही स्वत:ला एक नियमच घालुन ठेवलाय - परस्त्री रखुमाईसमान !
..माझे माऊली, तू जा इथनं.. आम्हाला आकर्षित करायचे कसलेही प्रयत्न करू नकोस.. आम्ही विष्णुदास तसे नसतो....एका स्त्रीचं असं अध:पतन होणं, मला सहन होत नाही, तू ते वावगे शब्द तोंडातून काढूही नकोस. शेवटी तुका म्हणे, "तुला जर नवराच पायजे - तुला संगच हवाय तर बाहेर नरांची कुठं कमी आहे?"...मंबाजी आणि त्याच्या टोळक्यानं एका वेश्येला पैशांचं आमिष दाखवून तुकोबारायाकडं पाठवलंवतं... तिनं त्यांच्या प्रवचनाला जाऊन, अनुयायी असल्याचं नाटक करून तुकाराम महाराजांना नादी लावायचं आणि या टोळीनं त्यांना रेडहॅन्ड पकडून त्यांची बदनामी करायची असं कारस्थान रचलंवतं. पन तुकोबारायाला एवढे लेचेपेचे होते व्हय? आवो, तुकोबा वरवरचे संत नव्हते. आतून बाहेरून अस्सल, शंभर नंबरी सोनं होतं ते.. भुललं नाय असल्या मोहाला.
या अभंगातनं तुकोबारायांनी समस्त वारकर्यांना एक मोलाचा संदेशबी दिलाय. "परस्त्री रखुमाईसमान आहे". बाईकडं बघण्याची नजरच झटक्यात स्वच्छ होऊन जाते वो. शरीरसुखाचं आमिष दाखवणार्या बाईला "जाई वो तू माते" म्हणत दूर करायला लै लै लै टोकाचा संयम लागतो... तीसुद्धा एक बाई आहे, तिच्या शारीरिक इच्छा पूर्ण करून घ्यायचा तिला अधिकार आहे..त्या भावनेचा मान राखत, तिला सेक्सच हवा असेल तर बाहेर अनेक 'नर' आहेत, तिकडे तिनं जावं हे नम्रपणे सांगणं तर अफलातून आहे !
आपल्याला शब्दांचा,भाषेचा समर्पकपणे वापर शिकायचा असंल तर तुकारामांच्या अभंगांसारखं साधन नाय ! शेवटच्या ओळीत तुकोबारायांनी 'पुरूष' हा शब्द न वापरता 'नर' हा शब्द वापरलाय. इथं प्रतिभेची झलक दिसते. फक्त सेक्ससाठी एकत्र येतात ते 'नर-मादी'. 'पुरूष आणि स्त्री'मध्ये काहीतरी भावबंध निर्माण व्हावे लागतात !
माझ्या दोस्तांनो, अफाट-अचाट-अफलातून माणूस होता आपला तुकोबाराया... खराखुरा संत. अस्सल समाजसुधारक. प्रतिभावान कवी ! जोपर्यन्त या पृथ्वीतलावर 'माणूस' आहे तोपर्यन्त ही गाथा तरणार आहे.. माणसाला हिताचा मार्ग दाखवत रहाणार आहे...- किरण माने.
दरम्यान, किरण माने यांची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे. मराठी सिनेसृष्टीवर राज्य करणारे किरण माने लवकरच एका नव्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'सिंधुताई माझी माई- गोष्ट चिंधीची' या मालिकेत ते मुख्य भूमिका साकारणार आहेत. यापूर्वी ते मुलगी झाली हो या मालिकेत झळकले होते.