Join us

"प्रेयसीच्या आठवणींत जपून ठेवलेत तर बायकोच्या...", कुशल बद्रिकेची शोकांतिका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 1:46 PM

कुशलने नुकतंच त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याने एक शोकांतिका मांडली आहे.

कुशल बद्रिके हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. उत्तम अभिनय आणि विनोदीशैलीच्या जोरावर कुशलने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या कुशलने अपार मेहनत आणि कष्टाच्या जोरावर स्वत:ची ओळख बनवली. कुशल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील माहिती तो चाहत्यांना पोस्टद्वारे देत असतो. त्याबरोबरच अनेक मजेशीर व्हिडिओही तो शेअर करत असतो. 

कुशलने नुकतंच त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याने एक शोकांतिका मांडली आहे. कुशल म्हणतो, "माणसाला एकवेळ हरवलेलं सुख सापडेल...पण, सुकत घातलेल्या सॉक्सच्या जोडीतील एक सॉक्स हरवला तर तुम्हाला सांगतो, शोधून देव सापडेल...पण, तो एक सॉक्स काही सापडायचा नाही. आयुष्यात जोडीदार गमावण्याचं दु:ख काय असू शकतं, याची जाणीव मला मी कामाला निघालेलो असताना हाती लागलेल्या त्या एका सॉक्सकडे बघून येते". 

पुढे तो म्हणतो, "आपल्या जुन्या प्रेयसींच्या आठवणींसारखे मी ते उरलेले एक-एक सॉक्स एका पिशवीत सांभाळून ठेवले होते. आता पावसाळ्यात पाय थंड पडले की माझी बायको ते वेगवेगळ्या रंगाचे सॉक्स अगदी आनंदाने घालते. आता प्रेयसीच्या आठवणींसारखे जपून ठेवलेत म्हटल्यावर बायकोच्या पायदळी तुडवलं जाणं, हे त्यांच्या नशीबी आलंच...मी पण संसाराला सरावल्यासारखा तिला म्हणतो, टाकाऊपासून टिकाऊ तुला छान जमतं हा...त्यावर उत्तरादाखल ती आमच्या लग्नाचा फोटो मला दाखवते. असो, पण मला असं वाटतं की आपण त्या सॉक्ससारखे आहोत. कधीकधी जोडीदार सोबत असतानाही हरवल्यासारखे...आणि कधी कधी एकटे असतानाही उपयोगात असलेले...स्वत:ला नव्याने गवसल्यासारखे...". 

कुशलच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, चला हवा येऊ द्यामधून घराघरात पोहोचलेल्या कुशलने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. मॅडनेस मचाऐंगे या हिंदी कॉमेडी शोमध्येही तो दिसला होता. या शोमधून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 

टॅग्स :कुशल बद्रिकेटिव्ही कलाकारमराठी अभिनेता