‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय शोमधील विनोदवीर कुशल बद्रिके (Kushal Badrike) म्हणजे धम्माल मनोरंजन. आपल्या विनोदी शैलीमुळे प्रेक्षकांचे मनं जिंकणारा कुशल सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टिव्ह आहे. सतत नवनवीन पोस्ट शेअर करत तो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतो. सध्या त्याची एक अशीच पोस्ट लक्ष वेधून घेतेय. आता त्याने पत्नी सुनयनासोबतचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.
व्हिडीओत कुशल ड्रायव्हिंग सीटवर आहे आणि शेजारी त्याची पत्नी सुनयना बसली आहे. गाडी ट्रॅफिकमध्ये अडकून पडलीये, कुशल जाम वैतागला आहे आणि सुनयना मस्तपैकी कानाला इअरफोन लावून ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गाणं ऐकतेय. शिवाय त्यावर हातानं डान्स स्टेप्स करतेय.
या व्हिडीओला कुशलने मजेशीर कॅप्शन दिलं आहे. ‘प्रवास म्हटलं की ट्रॅफिक लागणारच, त्यात वेळ जात नाही म्हणून असं कोण वागतं यार. तुमचा वेळ जातो ओ... इथे आमचा जीव...जाऊ दे चल आता तो विषय नको...,’ असं कॅप्शन त्याने दिलं आहे.
कुशलचं लव्ह मॅरेज असून त्याने 2009 मध्ये सुनयनाशी लग्नगाठ बांधली. आज या दोघांना दोन गोड मुलं आहेत. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते अगदी तसंच कुशलच्या मागेदेखील सुनयना कायम उभी राहिली. पण या सगळ्यात ती नं आपलं करिअर देखील सांभाळलं. सुनयना कथ्थक डान्सर आहे. कुशलच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. ‘जाम डेरिंग केली तुम्ही,’ अशी कमेंट एका चाहत्यानं केली आहे. कुशलजी तुम्ही अशोक मामाचा डान्स करायचा ना, अशी कमेंट अन्य एका चाहत्याने केली आहे. प्यार किया तो डरना क्या... पर शादी किया तो डरना पडता है रे बाबा..., अशी भन्नाट कमेंट एका चाहत्याने केली आहे.