Samir Choughule: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातून समीर चौघुले हे नाव घराघरात पोहोचलं. आपल्या विनोदी कौशल्याच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या खळखळून हसवलं. समीर चौघुले (Samir Choughule) यांना विनोदवीर म्हणून ओळखलं जातं. त्यांचा चाहतावर्ग सुद्धा खूप मोठा आहे. सध्या समीर चौगुले 'गुलकंद' सिनेमामुळे चर्चेत आले आहेत. या सिनेमात प्रसाद ओक, सई ताम्हणकर आणि ईशा डे अशी तगडी स्टारकास्ट आहे. अशातच आता या सिनेमाच्या निमित्ताने समीर चौघुलेंनी दिलेल्या मुलाखतीमध्ये विनोदामुळे आपल्या आयुष्यात काय बदल घडू शकतो? याबद्दल भाष्य केलं आहे.
नुकतीच समीर चौघुले आणि ईशा डे यांनी अमुक तमुक या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. त्यादरम्यान एक किस्सा सांगत ते म्हणाले, "लोकं जेव्हा सांगतात की, आम्ही दादर स्टेशनला ट्रेनमध्ये चढतो, पूर्वी आमची संध्याकाळी भांडणं व्हायची. कारण दिवसभर काम करुन डोकं तापलेलं असायचं आणि डोंबवलीला जाईपर्यंत रोज माझी दोन भांडणं व्हायची. पण आज मी दादरला गेल्यानंतर हास्यजत्रा सुरु करतो ते डोंबिवलीपर्यंत माझ्या चार स्किट्स बघून होतात. त्या प्रवासात मला कळत नाही की डोबिंवली कधी आलं. ही आमच्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे, हा संदेश नाही. शिवाय जेव्हा लोकं सांगतात आधी मला टक्कल होतं तेव्हा लोकं मला प्रचंड चिडवायचे. पण, मी तूमचं स्किट बघितल्यानंतर तुम्ही स्वत: वरचे विनोद ज्या खेळकर पद्धतीने घेता मला त्यामुळे खोटे विग वगैरे लावत. मी असाच फिरतो. ही आमच्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. हे कार्य आहे. तर हे कार्य लोकांनी समजून घ्यावं."
पुढे अभिनेते म्हणाले, "विनोद लोकांना करु द्यावेत. जशा लोकांच्या जबाबदाऱ्या आहेत तशा एक कलावंत म्हणून आमच्याही काही जबाबदाऱ्या आहेत. विनोदाने मर्यादा ओलांडली नाही पाहिजे. विनोद फाजील असला तरी चालेल पण तो अश्लील नसला पाहिजे. त्याचबरोबर वैयक्तिक गोष्टींवर, व्यंगावर बोलणारा विनोद नसावा. दोघांनीही ही सीमारेषा पार करु नये." अशा भावना समीर चौगुले यांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने प्रस्तुत आणि वेलक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित, सचिन मोटे लिखित, सचिन गोस्वामी दिग्दर्शित ‘गुलकंद या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत आणि शार्विल आगटे यांच्या मुख्य भूमिका आहेत. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया हे चित्रपटाचे निर्माते आहेत. हा सिनेमा १ मे २०२५ ला रिलीज होणार आहे.