Join us

'पोलिस खात्यापेक्षा नक्कीच चांगलं जग असेल याची..'; वडिलांसाठी मिलिंद गवळींची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 15:08 IST

Milind gawali:कलाविश्वाप्रमाणे मिलिंद गवळी सोशल मीडियावर सक्रीय असून ते अनेकदा मालिका आणि त्यांच्या भूमिकेविषयी व्यक्त होत असतात.

उत्तम कथानक आणि कलाकारांच्या अभिनयामुळे अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते'. ही मालिका सध्या यशाच्या शिखरावर असून त्यातील प्रत्येक कलाकार विशेष लोकप्रिय झाला आहे. यात खासकरुन संजना, अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्यावर तर प्रेक्षकांनी अक्षरश: प्रेम केलं. त्यामुळे त्यांच्याविषयीचे अपडेट्स जाणून घ्यायला नेटकऱ्यांना कायम आवडतं. यात अनिरुद्ध म्हणजेच मिलिंग गवळी सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.

कलाविश्वाप्रमाणे मिलिंद गवळी सोशल मीडियावर सक्रीय असून ते अनेकदा मालिका आणि त्यांच्या भूमिकेविषयी व्यक्त होत असतात. यावेळीदेखील त्यांनी अशीच एक पोस्ट शेअर केली आहे.

"काल “आई कुठे काय करते” च्या सेटवर माझे वडील श्री. श्रीराम गवळी आले होते ,त्यांच्याबरोबर श्री. अरविंद वैद्य जे 'अनुपमा' या सिरीयलमध्ये वडिलांचे काम करतात, ते पण आले होते आणि सेटवर त्यांची भेट किशोरजी महाबोलेंशी झाली, जे अनिरुद्धच्या वडिलांचे काम करतात, या तिघांची जी भेट झाली आणि मला असं वाटलं, ही आहे ग्रेट भेट. तिघही अतिशय तरुण, उत्साही आणि हुशार अनूभवी, माझ्यासाठी हा कालचा दिवस खूप आनंददायी आणि छान गेला ,खूप गप्पा झाल्या ,जेवणं झाली ,परत चहा झाले, सहकलाकार यांच्या भेटी झाल्या, अरविंदजींना संजनाचे कॅरेक्टर खूप आवडतं, त्यामुळे त्यांच्या तिच्याशी @rupalibhosle खूप गप्पा झाल्या. आणि, तिला भरभरून त्यांनी आशीर्वाद दिले.  शंतनु मोघेचे वडील श्रीकांतजी मोघे हे अरविंदजींचे मित्र होते, त्यामुळे शंतनुची भेट झाली. त्याला त्यांनी आशीर्वाद दिले. सुलभा देशपांडे यांची आठवण काढली आणि त्यांचा चिरंजीव निनाद देशपांडे तोही काल शूटिंग करत होता, त्याची भेट झाली, मग अश्विनी महांगडे, गौरी कुलकर्णी ,अभिषेक देशमुख ,निरंजन कुलकर्णी ,सगळ्यांशी छान गप्पा झाल्या. काल मला तो दिवस आठवला तीस-पस्तीस वर्षांपूर्वी माझा हात धरून गोविंद सरया यांच्या चित्रपटाच्या सेटवर माझे वडील मला घेऊन गेले होते ,सिनेमाचं नाव होतं “वक्त से पहले “ खूप घाबरलो होतो", असं मिलिंद गवळी म्हणाले.

पुढे ते म्हणतात,"एक्टिंग , सिनेमा काय असतं काहीच माहिती नवतं, ( still I’m unaware) माझ्या वडिलांनी त्यांचे पोलिस खातं जिथे, खूप खडतर प्रवास आहे त्या मार्गावर मला न पाठवता. या चंदेरी दुनियेचा मार्ग मला दाखवला. वेगळंच विश्व होतं. या विश्वाची त्यांनाही कल्पना नव्हती पण पोलिस खात्यापेक्षा नक्कीच चांगलं जग असेल याची त्यांना खात्री होती. माझी आवड बघून त्यांनी मला साथ दिली , मला ते नेहमी म्हणत आलेले आहेत “काळजी करू नकोस मी आहे “ आणि खरंच ते आहेत म्हणून मी आहे, होतो आणि राहणार. माझे पप्पा आणि अरविंद जी 80 प्लस आहेत पण कुठल्याही तरुण मुलाला लाजवतील इतका उत्साह त्यांच्यात आहे."

टॅग्स :मिलिंद गवळीटेलिव्हिजनटिव्ही कलाकारआई कुठे काय करते मालिका