‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. या मालिकेतील काम करणाऱ्या कलाकारांना तर प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरलं. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी. या मालिकेत ते अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं. मिलिंद गवळी हे सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
मिलिंद गवळी यांनी लिहिलं आहे,"केस कापणे हा सुद्धा एक टास्क आहे. कन्ट्युनिटी मेंटेन करणं सुद्धा कठीण काम असतं. मालिका सुरू असताना केस कधी कापायचे हा खूप मोठा प्रश्न असतो. सारखे सीन चालू असतात त्याच्यामध्येच जर तुम्ही केस कापले तर तो एक मोठा जर्क दिसतो".
मिलिंद गवळी यांनी पोस्टमध्ये लिहलं की, "मी ज्यावेळेला सिनेमे करायचो त्यावेळेला तर एक हेअर स्टाईल ही मला जवळजवळ वर्षभर तरी ठेवावी लागायची. कारण सिनेमाचं शूटिंग पूर्ण होईपर्यंत ती केसांची स्टाईल बदलता यायची नाही, त्यामुळे फक्त केस ट्रिम करत राहणे एवढेच करता यायचं आणि मग खूप मोठा प्रश्न पडायचा की केस कापणाऱ्याला आपण काय सांगायचं , की आपल्याला कसे केस कापून हवे आहेत . त्यामुळे बरीच वर्ष मी माझे माझे केस ट्रिम करायचो, आता स्वतःचे केस कापण्याचा इतका सराव झाला आहे की कोरोनामध्ये दर पंधरा-वीस दिवसांनी मी माझेच केस ट्रिम करत बसायचो, काही चुकलं तर भीतीच नसायची, तेव्हा केस कापायचा माझा छान सराव झाला".
पुढे ते लिहतात, "पण गेल्या तीन वर्षापासून मी ठाण्यात एका व्यक्तीकडे केस कापतो आहे. पण गेल्या तीन वर्षात मी त्याच्याकडे फक्त सहा वेळा गेलो आहे. मधल्या वेळेला मी माझे माझे केस स्वतः ट्रिम करतो. पूर्वी केस कापायला अगदी दोन हजार अडीच हजार रुपये पण द्यायचो . घरी आपले केस कापायला बोलवण्याच्या ऐवजी मला स्वतः सलोन मध्ये जाऊन केस कापायला आजही छान वाटतं. माझे केस कापणाऱ्या व्यक्तीला आता अनिरुद्ध पात्राच्या केसांची स्टाईल इतकी चांगली पाठ झाली आहे की मला त्याला काहीच सांगावं लागत नाही, जाऊन फक्त खुर्चीत बसायचं आणि छानशी कॉफी पीत आपले केस कापून घ्यायचे. दोन-तीन महिन्यात ना हा एक छान अनुभव असतो", असे मिलिंद गवळींनी पोस्टमध्ये म्हटले. मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आहे.