आपल्या विनोदशैलीच्या जोरावर अवितरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे पॅडी अर्थात पंढरीनाथ कांबळे. अनेक गाजलेले चित्रपट, टीव्ही शो यांच्या माध्यमातून पॅडीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा पॅडी लवकरच रंगमंचावर झळकणार आहे.
नुकतीच पॅडीच्या आगामी 'कुर्रर्रर्रर्र’ या नाटकाची घोषणा करण्यात आली आहे. या नाटकात पॅडी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून त्याने नाटकाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. 'प्रग्यास क्रिएशन्स' आणि व्ही. आर. प्रोडक्शन्स या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून हे नाटक रंगभूमीवर येत आहे. अभिनेता पंढरीनाथ कांबळे याने गेली कित्येक वर्ष मराठी चित्रपट व रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला असून हास्यजत्रेत विविधांगी भूमिकेतून आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.
"कुर्रर्रर्रर्र" म्हणजे काय ? किंवा या नावाचा अर्थ काय ? हा प्रश्न रसिकांना पडला असेलच. याच उलगडा लवकरच होणार आहे. मात्र, हे नाटक सत्य घटनेवर आधारित असून आई-वडील, मुलगी आणि जावई यांच्या या नाटकाचं कथानक फिरणारं आहे.
पंढरीनाथ कांबळे अभिनित या नाटकात हलकी फुलकी कॉमेडी असणार आहे. या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद खांडेकर यांचं आहे. प्रसाद खांडेकर यांच्या दिग्दर्शनाखाली पॅडीचे हे तिसरे नाटक असून ‘दिल तो बच्चा है जी’, ‘पडद्याआड’ ही नाटकं त्याने केली आहेत. "कुर्रर्रर्रर्र " हे नाटक ४ डिसेंबरला रंगभूमीवर येत आहे.