Join us

Exclusive: "एकच सीन होता पण...", अभिनेता पंकज विष्णूने सांगितला बिग बींसोबत काम करण्याचा अनुभव

By ऋचा वझे | Updated: February 24, 2025 12:18 IST

अमिताभ बच्चन आणि अभिषेक या दोघांसोबत काम करता आलं...पंकज विष्णूने सांगितला अनुभव

'चार दिवस सासूचे', 'अवघाची संसार', 'पवित्र रिश्ता' अशा अनेक मालिकांमध्ये दिसलेला अभिनेता पंकज विष्णू (Pankaj Vishnu). सध्या पंकज कुठे गायब आहे असा प्रश्न अनेक मराठी प्रेक्षकांना पडला असेल. तर अभिनेता पंकज सध्या हिंदी मनोरंजनविश्वात सक्रीय आहे. सध्या तो 'डोरी' या हिंदी मालिकेतही काम करत आहे. तसंच त्याची हॉटस्टारवरील सीरिज 'पॉवर ऑफ पांच'ही तुफान चालत आहे. विशेष म्हणजे पंकजने अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिषेक बच्चन या दोघांसोबतही काम केलं आहे. नुकतंच त्याने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत याचा अनुभव सांगितला. 

अभिनेता पंकज विष्णूने अभिषेक बच्चनसोबत 'बिग बूल' सिनेमात काम केलं आहे. २०२१ साली हा सिनेमा आला होता. नंतर त्याने अभिषेकच्याच २०२३ साली आलेल्या 'घुमर' सिनेमातही काम केलं. यात तर त्याला चक्क अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत याचा अनुभव सांगत तो म्हणाला, "घुमर मध्ये बिग बींसोबत काम करता आलं आणि माझं स्वप्च पूर्ण झालं. अमिताभ बच्चन म्हणजे आमच्यासाठी देव आहे. लहानपणापासून ज्यांचं काम पाहून मोठे झालो त्यांच्यासोबत एकच सीन करायला मिळाला. अनेकदा अमिताभ बच्चन यांच्यासोबत जाहिरातींमध्ये मी शॉर्टलिस्ट व्हायचो पण नेमकं ते वर्कआऊट व्हायचं नाही. पण यावेळी ते वर्कआऊट झालं. मला आनंद झाला. एक सीन जरी असेल तरी मला तो करायचाच होता. या क्षेत्रात येऊन बच्चनसोबत काम करता आलं नाही तर काय फायदा. त्यामुळे ते महत्वाचं होतं. तसंच त्यांच्यासोबत सीन आहे ना? त्यांचं वेगळं शूट आणि आमचं वेगळं शूट असं तर नाही ना हे मी विचारुन घेतलं. पण तो सीन त्यांच्यासोबतच शूट होणार होता याचा मला आनंद झाला. कारण बिग बी स्वत: सिनेमात पाहुणे कलाकार होते."

Exclusive: "ऑडिशनमधून माझी निवड झाली अन्...", लोकप्रिय हिंदी सीरिजमध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता

अशा प्रकारे अभिनेत्याचं बिग बींसोबत काम करण्याचं स्वप्न पूर्ण झालं. पंकज विष्णू सध्या हिंदीत सक्रीय असला तरी त्याने 'हृदयी प्रीत जागते' ही मराठी मालिकाही केली होती. मात्र ही मालिका लवकर संपली. तसंच त्याने मकरंद अनासपुरेंसोबत 'छापा काटा' सिनेमातही काम केलं. आता त्याला पुन्हा एकदा मराठी मालिकांमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

टॅग्स :मराठी अभिनेताअमिताभ बच्चनबॉलिवूडटिव्ही कलाकार