ठाणे - मराठी चित्रपट मालिका आणि नाटकांमध्ये आपल्या भूमिकेने छाप पाडणारे ठाण्यातील अभिनेते पराग बेडेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. ते 47 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची आई आणि पत्नी आहे. यदाकदाचित, नथुराम गोडसे यांसारख्या अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केले. आभाळमाया या मालिकेतील त्यांची भूमिका देखील गाजली होती.
पराग बेडेकर गेले तीस वर्षापासून अभिनेक्षेत्रात काम करत होते. पाच वर्षांपूर्वी त्यांना पोटाचा आजार झाला होता त्यांच्या जठराचे ऑपरेशन झाल्यामुळे खाण्यापुरण्यावर बंधन आली होती. त्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत होता. अशक्तपणामुळे त्यांना फारसे काम करणे झेपत नव्हते. 13 डिसेंबरला त्यांना रात्री साडेआठ वाजता हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. 14 तारखेला सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या जाण्याने मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे सुप्रसिद्ध लेखक चंद्रशेखर गोखले यांनी त्यांच्यावर एक पोस्ट देखील लिहिली आहे.
पराग गेलाउत्कृष्ट अभिनेता, खूप सहज अभिनय करायचा, त्याच्या स्वताहाच्या काही खास लकबी होत्या बोलता बोलता नाक चोळण्याची त्याची खास स्टाईल होती मी त्या वरून छेडलं की छान हसायचा, हास्य तर लाजवाब होतं त्याचं कुठे गेला कुठे गेला हा शोध आज अचानक थांबला.