Join us

"किचकट आजार सरप्राईज म्हणून समोर ठाकला" रोहन गुजरच्या पत्नीला कॅन्सरचं निदान, पोस्ट शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2023 3:35 PM

स्नेहल गुजरची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

'होणार सून मी या घरची' फेम पिंट्या म्हणजेच अभिनेता रोहन गुजर (Rohan Gujar) लोकप्रिय आहे. त्याची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांवर छाप पाडते. सध्या तो 'आमने सामने' नाटकात काम करत आहे. तसंच 'नवी जन्मेन मी' मालिकेतून पुन्हा छोट्या पडद्यावर आला आहे. दरम्यान रोहनची पत्नी स्नेहल गुजर हिला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. स्नेहलची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

रोहनची पत्नी स्नेहल स्वत: मार्केटिंगमध्ये काम करते. स्नेहलला ऑगस्ट महिन्यात कॅन्सरचे निदान झाले. यानंतर तिने चार दिवसांपूर्वीच पोस्ट शेअर कर तिने लिहिले, ' Chapter 2 : ‘Surprise’ ऑगस्ट महिन्यात छातीत  डाव्या  बाजूला दुखणं सुरु झालं...हे दुखणं नवीन होतं... आधी कधीही अनुभवलं नव्हतं...पाठपुरावा करायचं ठरवलं आणि किचकट आजार surprise म्हणून समोर ठाकला... ‘स्टेज झिरो कॅन्सर’ (Ductal carcinoma in situ)...कॅन्सर च्या आधीची स्टेज...२ मॅमोग्राम, बायोप्सी, सोनोलोकोलायझेशन, ३ नोव्हेंबर ला ब्रेस्ट कन्झर्वेशन (conservation) सर्जरी, आणि रेडिएशन अशा टप्प्यांतून उपचार सुरु आहेत...

ह्या आजाराने मला पूर्ण पकड्ण्याधीच मी त्याला एक टप्पा आऊट करू शकले याचं समाधान आहे... मनाला आणि शरीराला गेल्या महिन्याभरात खूप सहन करावं लागलंय...अजूनही लागतंय... संपूर्ण प्रक्रियेत मेंटल, इमोशनल ब्रेक डाऊन चे अनेक प्रसंग येतात...मला डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा आणि surgery नंतर पहिल्यांदा जखम पाहिली तेव्हा डोळ्यांना थांबवता नाही आलं...पण जखमांकडे, स्वतःच्या शरीराविषयी जागरूक असल्याची, या प्रसंगाला छान सामोरं गेल्याची खूण म्हणून पाहिलं की गोष्टी सोप्या होतात... त्या अजून सोप्या होतात जेव्हा तुमचं कुटुंब तुमच्यासोबत खंबीरपणे उभं राहतं…या बाबतीत माहेर आणि सासर दोन्ही कुटुंबांना १०० गुण…कोणताच ड्रामा नाही, साध्या सोप्या पद्धतीने आहे ते accept केलं आणि वातावरण पूर्णपणे नॅार्मल ठेवलं….

"मीच का? माझ्यासोबतच का?" असे प्रश्न कटाक्षाने टाळायला हवेत... सहानुभूतीचा मोह आवरायलाच हवा... तरच विचारांत धैर्य, भावनांत स्थैर्य येऊ शकतं...’ दिसतं तेच वास्तव’ या पलीकडे जाऊन आयुष्याचा विचार सुरु झालाय...

या सगळ्या काळात जाणवलेली अजून एक गोष्ट म्हणजे या आजाराविषयी जीवघेणा आजार म्हणून जितकं अवडंबर माजवलं जातंय तेवढी जनजागृती नाही... अजूनही या विषयी सांगणं/ बोलणं आपण टाळतो... मुली/ महिला मॅमोग्राम करणं टाळतात, हे करणं का गरजेचं आहे त्या विषयीचा awareness कमी पडतोय... हा आजार अनुवंशिक ही असू शकतो हे मला या process मध्येच कळलं... पण त्या पलीकडेही हे बदलत्या जीवनपद्धतीचं, अवाजवी stress चं प्रतिबिंब आहे... हे विसरता काम नये...तणावापासून स्वतःला दूर ठेवणं ही तुम्ही स्वतःसाठी, आयुष्याप्रति दाखवलेली basic कृतज्ञता असेल...मीही अजून हे शिकतेचं आहे...

दसरा ते दिवाळी या १५ दिवसांत शरीरातून ही कॅन्सरची नकारात्मकता काढून टाकलेय… यंदा दिवाळीत योगायोगाने खूप दिवे गिफ्ट मिळाले… मी ते ‘तिमिरातून तेजाकडे’ याचं प्रतिक मानलेत… Radiation starts today'.

रोहन गुजरच्या पत्नीच्या या पोस्टवर 'लवकर बरी हो' असं म्हणत कलाकारांनी तिला धीर दिला आहे.

टॅग्स :रोहन गुजरमराठी अभिनेतापरिवारस्तनाचा कर्करोग