Join us

'प्रत्येक क्षणांत मला असं वाटत होतं कि....', संकर्षण कऱ्हाडेची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 17:34 IST

Sankarshan Karhade: आपल्या कलागुणांमुळे संकर्षण अल्पावधीत लोकप्रिय झाला. त्यामुळे आज त्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, कवी आणि उत्तम सूत्रसंचालक म्हणून नाव कमावणारा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे (sankarshan karhade). आपल्या कलागुणांमुळे संकर्षण अल्पावधीत लोकप्रिय झाला. त्यामुळे आज त्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.  नाटक, मालिका अशा विविध माध्यमातून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. संकर्षण सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. त्याने एखादी पोस्ट शेअर केली रे केली की ती व्हायरल झालीच समजा. सध्या त्याची अशीच एक पोस्ट व्हायरल होतेय.

सध्या नाटकाच्या प्रयोगासाठी संकर्षण कोकणात गेला आहे. यावेळी त्याने रत्नागिरीच्या गणपतीपुळ्याच्या मंदिरात त्याच्याबरोबर घडलेला अद्धभूत अनुभव शेअर केला आहे. 

संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट “बाबा , काळजी करु नका.. गणपती मला स्वत: घ्यायला येईल ..” (माझा हा अनुभव PLEASE नक्की वाचा.. )

मी परवा मुंबईहुन नाटकाच्या कोकण दौऱ्यासाठी निघतांना घरात सहज म्हणालो कि , रत्नागीरीहून २.३० तासावर गणपतीपुळे आहे.. दर्शनाला जाउन येइन. तेंव्हा बाबा काळजीने म्हणाले कि, का धावपळ करतोस..? वेळ मिळालाय तर दिवसभर आराम कर.. त्यात तू जाणार कसा ..? प्रवासाचं काय नियोजन ..?हे विचारल्यावर मी अगदी सहज थाटात म्हणालो कि,“बाबा काळजी करु नका.. मला गणपती स्वत: घ्यायला येईल ..” आणि घरुन निघालो…..

काल रात्री रत्नागीरीच्या प्रयोगाला गणपतीपुळे देवस्थान चे पुजारी श्री. उमेश घनवटकर प्रसादाचे उकडीचे मोदक घेउन आले.. मला म्हणाले चला दर्शनाला गाडी घेउनच आलोय.. मी म्हणालो पण माझं काही तशी तयारी नाहीये.. शिवाय आमची राहायची सोय चिपळून ला आहे .. तेंव्हा ते म्हणाले रहायची , दर्शनाची , जेवणाची सगळी सोय , नियोजन मी करतो.. तुम्ही फक्तं गाडीत बसा आणि चला .. मला माझंच स्वत:चं वाक्यं आठवलं “बाबा काळजी करु नका.. मला गणपती स्वत: घ्यायला येईल ..” .. मी रत्नागीरीच्या प्रयोगानंतर त्यांच्या गाडीत बसलो तर अर्थातच समोर गणरायाचा छानसा फोटो ..  काल मध्यरात्री सुखरूप इथे पोचलो .. राहाण्याची उत्तम सोय त्यांनीच कोली.. आज सकाळी त्यांनीच मला सोवळं दिलं .. दर्शनाला घेउन गेले .. माझ्या हातून बाप्पाचा अभिषेक केला.. आणि मनसोक्तं खायला घातलं ..मी तुम्हाला कसा सांगु ह्या प्रत्येक क्षणांत मला असं वाटत होतं कि हे सगळं गणपती मी उच्चारलेल्या त्या एका वाक्यासाठी माझ्याकडून करवून घेतोय.. माझी आई मला माझ्या लहानपणापासून सांगत आलीये कि , “बोलतांना कायम चांगलं बोलावं .. “ मी उच्चारलेल्या त्या एका चांगल्या वाक्यासाठी गणपती बाप्पा ने माझ्यासाठी काय काय केलं..मी खूप भाराऊन गेलोय.. बाप्पा मोरया .. 

टॅग्स :सेलिब्रिटीटिव्ही कलाकार