सध्याच्या काळात कोणत्याही प्रसंगी फोटोशूट करणं हा जणू ट्रेंडचं सुरु झाला आहे. हा ट्रेंड कलाविश्वातूनच पुढे आला आहे. अनेक सेलिब्रिटी कोणत्याही लग्नसोहळ्यात, नव्या आऊटफिटमध्ये हटके फोटोशूट करत असतात. विशेष म्हणजे यामध्ये केवळ अभिनेत्रीच नव्हे तर अभिनेतेही अग्रेसर आहेत. आतापर्यंत अनेक अभिनेत्यांनी त्यांचं हटके फोटोशूट केलं आहे. यात प्रसाद ओक, भूषण प्रधान, हार्दिक जोशी, स्वप्नील जोशी अशा कितीतरी कलाकारांचा समावेश आहे. मात्र, मराठी कलाविश्वात असा एक अभिनेता आहे ज्याने पहिल्यांदाच फोटोशूट केलं आहे. यातील काही फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना कसा दिसतोय असा प्रश्नही विचारला आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारा संकर्षण सध्या 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत समीर ही भूमिका साकारत आहे. संकर्षण कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही कमालीचा सक्रीय आहे. मात्र, तो कायम त्याच्या नाटकासंदर्भात वा मालिकेसंदर्भात पोस्ट शेअर करत असतो. परंतु, यावेळी पहिल्यांदाच त्याने फोटोशूट केलं आहे.
“माझ्या आयुष्यातलं पहिलं फोटोशूट आहे हे “ Pose , Expressions सगळ्याचेच वांदे होते.. जे काही छान दिसतंय ते brilliant photographer Shashank Sane चं आहे..कपड्यांचं correct Styling केलंय sincere Style Saga By Ag ने .. माझ्या चेहऱ्यावरचं काय मेक अप ने झाकायचंय हे बरोब्बर कळंल @deeptipalsulemakeup ला आणि Outfit by - @mr_king_theluxurystore Shoot assisted by - @shubhangi_mohdure Location - @maujispaces Thanks to you all तुमचं काय म्हणनं आहे ..? बरं झालंय का ..?", अशी पोस्ट संकर्षणने शेअर केली आहे.
दरम्यान, संकर्षण एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच एक कवी, लेखकदेखील आहे. अनेकदा तो त्याचे विचार कवितांच्या माध्यमातून मांडत असतो. तसंच तो मालिकांसह नाटकांमध्येही काम करतो. सध्या त्याचं 'तू म्हणशील तसं!!' हे नाटक चांगलंच लोकप्रिय ठरत असून त्याचे आतापर्यंत असंख्य प्रयोग झाले आहेत.