संकर्षण कऱ्हाडे हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करुन संकर्षणने अभिनयाचा ठसा उमटवला. संकर्षण सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा फोटो टाकण्याबरोबरच समाजातील घडामोडींवरही संकर्षण त्याच्या पोस्टमधून भाष्य करतो. आता संकर्षण पहिल्यांदाच राजकीय नेत्यांबाबत पोस्टमधून व्यक्त झाला आहे.
संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. “मी कधीही राजकीय नेत्यांवर भाष्यं करत नाही...त्या संदर्भात पोस्ट तर करतच नाही...कारण तो माझा प्रांत नाही...मला त्यातलं ज्ञान नाही..पण, आज Social Media वर तीन वेगवेगळ्या पोस्टं पाहिल्या आणि खरंच छान वाटलं. १) घटनास्थळी धावलेले , पुनर्वसनाचे आश्वासन देणारे “मुख्यमंत्री” २) त्यांच दुर्दैवी घटनांचा आढावा घेणारे , नियोजन पाहाणारे “उपमुख्यमंत्री”आणि ३) “वंदे मातरम् “ विषयी संयममाने , योग्यं शब्दात समज देणारे “उपमुख्यमंत्री”...तिघेही वेगळ्या पक्षाचे पण बरं वाटलं की एकाच वेळी आमचं रक्षण, नियोजन आणि स्वाभिमान तिन्ही गोष्टींविषयी तळमळीने कुणीतरी काम करतंय...शेवटी तुम्हां आम्हाला काय हवं?? तेच नं!!! खरं सांगू ..? आम्हाला तुम्ही सगळेच आवडता हो,” असं संकर्षणने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
संकर्षणच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. संकर्षण सध्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यग्र आहे.