मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) हा प्रेक्षकांचा आवडता अभिनेता. नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमात लिलया वावरणारा संकर्षण सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. त्याने एखादी पोस्ट शेअर केली रे केली की ती व्हायरल झालीच समजा. सध्या त्याची अशीच एक पोस्ट व्हायरल होतेय. कितीही बिझी असला, कितीही मोठा अभिनेता असला तरी कलाकाराला त्याचं एक खासगी आयुष्य असतं. सामान्य माणूस करतो, ती सगळी कामं त्यांना सुद्धा करावी लागतात. आता संकर्षणचंच उदाहरण घ्या. कामाच्या व्याप बाजूला ठेऊन तो आईसोबत मस्तपैकी भाजी खरेदी करण्यासाठी मंडईत गेला.
आता तुम्ही म्हणाल, हे तुम्हाला कसं कळलं? तर संकर्षणने आईसोबतचा भाजी मार्केटमधला झक्कास फोटो शेअर केला ना राव!! त्याने शेअर केलेला फोटो झक्कास आहेच. पण या फोटोला त्याने दिलेली कॅप्शन आणखीच झक्कास आहे. ‘किती वर्षांनी मी आईसोबत भाजी मंडईत पिशव्या उचलतोय. भाजी घेतांनाचा आईचा कॉन्फिडन्स... त्याला तोड नाही... आईच्या हातची चव इतकी कमाल की भाज्या ओरडून ओरडून म्हणत होत्या... आम्हाला घेऊन जा...,’ अशी कॅप्शन संकर्षणने या फोटोला दिली आहे.
उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारा संकर्षण सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत समीर ही भूमिका साकारत आहे.दरम्यान, संकर्षण एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच एक कवी, लेखकदेखील आहे. अनेकदा तो त्याचे विचार कवितांच्या माध्यमातून मांडत असतो. तसंच तो मालिकांसह नाटकांमध्येही काम करतो. त्याचं ‘तू म्हणशील तसं!!’ हे नाटक चांगलंच लोकप्रिय ठरत असून त्याचे आतापर्यंत असंख्य प्रयोग झाले आहेत.