सध्या सोशल मीडिया आणि युट्यूबचं पेव फुटलं आहे. अनेकांनी युट्यूबवर त्यांचं करिअर घडवलं आहे. अनेक अभिनेता आणि अभिनेत्रींनीही स्वत:चं युट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. असाच एक अभिनेता म्हणजे संकेत कोर्लेकर. संकेतच्या युट्यूब चॅनेल काही महिन्यांपूर्वीच सिल्व्हर प्ले बटन मिळालं. संकेतचे व्हिडिओही प्रचंड व्हायरल होतात. पण, आता संकेतने युट्यूबकडे करिअरच्या दृष्टिकोनातून पाहणाऱ्या तरुणांना मोलाचा सल्ला दिला आहे.
संकेतने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो म्हणतो, "माझं युट्यूब एवढं कमाल सुरू असताना दुसरं काही करण्याची मला गरज आहे? मला रोज युट्यूबवर स्वत:चं करिअर करण्यासाठी बरेच जण मेसेज करतात त्या सर्वांसाठी...हौशी मुलांनो...कल्पना आहे की युट्यूबवर खूप पैसा आहे प्रसिद्धी आहे. पण, तुम्ही सुरुवातीलाच सगळं सोडून युट्यूब मागे पळू नका...मला ६ वर्षांनी युट्यूबने कष्टाचं फळ दिलंय...युट्यूब चॅनेलवर २०० मिलियन व्ह्यूज मिळवणं किंवा डोकं वापरून ते मिळवणं ही खाऊची गोष्ट नाही आणि हा साधारण आकडा नाही".
"आज मी फक्त युट्यूबमध्ये करिअर करू शकतो पण हा निर्णय सगळ्यांसाठी योग्य नाही. मला खूप मेसेज येतात. मी मार्गदर्शन सुद्धा करतो. पण, लाखातला एकच इथे टिकतो, हे लक्षात ठेवा आणि मगच उडी मारा. अल्गोरिदम कसं काम करतो...आपलं Niche काय...हे सगळं शिका...अभ्यास करा...मगच फूल टाइम उडी मारा...युट्यूबमध्ये करिअर करणं सोपं काम नाही एवढं लक्षात ठेवा. कॅमेरा लॅपटॉपमध्ये कर्जावर लाखो उधळू नका. घरातल्यांचा विचार करा. जोवर किमान एक लाख सबस्क्राइबर्स होत नाहीत तोवर युट्यूबला छंद बनवून ठेवा...व्यवसाय नाही...शुभेच्छा", असं म्हणत संकेतने चाहत्यांना सल्ला दिला आहे.
संकेतचं Korlekarmania हे युट्यूब चॅनेल आहे. त्याचे युट्यूबवर जवळपास साडेतीन लाख सबस्क्राइबर्स आहेत. संकेतचे त्याच्या बहिणीबरोबरचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्याने अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे.