'झेंडा', 'प्रतिबिंब', 'शाळा', 'रेगे' अशा कितीतरी चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर (santosh juvekar). मालिकांपासून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या संतोष जुवेकरने कलाविश्वात त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. मराठीसह हिंदी कलाविश्वातही आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारा संतोष आज कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. परंतु, यशाचं शिखर सर करणाऱ्या या अभिनेत्याचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. एकेकाळी त्याला एक वेळच्या जेवणासाठीही स्ट्रगल करावा लागला होता. झी मराठीने अलिकडेच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर किचन कल्लाकार या कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये संतोष जुवेकर दिसून येत आहे. या प्रोमोमध्ये संतोष त्याच्या स्ट्रगल काळातील आठवणींना उजाळा देणार आहे. इतकंच नाही तर एकेकाळी जेवणासाठी किती संघर्ष करावा लागायचा हेदेखील त्याने सांगितलं आहे. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये संकर्षण कऱ्हाडे, संतोष समोर एक जेवणाचं ताट घेऊन येतो. या ताटामध्ये वरण-भात, पोळी, बटाट्याची भाजी आणि कंदा-मिरची असे पदार्थ असतात. हे पदार्थ पाहून तुला काय आठवतंय असा प्रश्न संकर्षण विचारतो. त्यावर संतोष त्याच्या जुन्या आठवणी सांगतो.
"ज्यावेळी करिअरची सुरुवात केली त्यावेळी फारसे पैसे नसायचे. त्यामुळे मग कधी या मित्राकडे, कधी मावशीकडे. असं तिकडे-तिकडे जेवायचो. पण, नंतर नंतर..असं रोज कोण जेवायला देणार. त्यामुळे मग खार स्टेशनच्या बाहेर वेस्टला एक हातगाडी आहे. तिथे २० रुपयात जेवण मिळायचं. असंच तीन पोळ्या, भात, बटाट्याची भाजी, लिंबाचं किंवा कैरीचं लोणचं आणि मिरची-कांदा त्यात असायचं", असं संतोष म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "आणि, जेवत असताना कोणी फोन केला आणि की कुठे आहेस विचारलं. तर सांगायचो की लिलामध्ये आहे..पण, खरंच ही खूप जवळची गोष्ट आहे माझ्या."
दरम्यान, संतोषची ही स्ट्रगल स्टोरी ऐकल्यानंतर अनेकांचं मन काही काळासाठी भरुन आलं. पण, आज यशाचं शिखर गाठल्यानंतरही संतोषचे पाय जमिनीवर आहेत आणि जुन्या आठवणी त्याच्या स्मरणात आहेत हे पाहून अनेकांनी त्याला दादही दिली. संतोषने मराठी-हिंदी चित्रपटांसोबतच अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. 'या गोजिरवाण्या घरात', 'वादळवाट', 'ऊन-पाऊस', 'किमयागार' या त्याच्या मालिका एकेकाळी तुफान गाजलेल्या आहेत.