'जीव माझा गुंतला' मालिकेतून अभिनेता सौरभ चौघुले घराघरात पोहोचला. या मालिकेत त्याने मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेनेच त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. सौरभ सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स तो चाहत्यांना देत असतो. समाजातील अनेक घडामोडींवरही तो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असतो.
आता सौरभने एक कविता शेअर केली आहे. त्याची ही कविता विचार करायला लावणारी आहे.
सौरभ चौघुलेची कविता
कसला राग, कसला माज, कसले पैसे, कसले रुगवे फुगवे आणि कसली जात पात...
सगळं काही क्षणिक...
मेल्यावर जळून राखेत आणि आगीतून चिमणीतल्या पत्र्याला आतून काजळी लावत हवेत उडणारा काळा धूर...
ज्यात तुमच्या आधी जळून गेलेल्यांची काजळी...तुम्हाला तुमची जात विचारून नाही चिकटवणार...
काही राहत नाही...तुम्ही एक काजळी असता...एक अशी काजळी जिला मेल्यावर किंमत नसते.
आगीचे लोळ फक्त लाकडं जाळतात...शरीर तर चार लाकडांमध्ये जळून जातं...त्यानंतर उरतो तो फक्त लाकडांचा केलेला व्यवहार...
कसलं कार्य, कसली शांती...कसली नाती आणि कसलं काय!
आणि त्या खाली पडलेल्या राखेत काय शोधता हो तुम्ही...तुमच्या माणसांची अस्थी?
तुमच्या आधी जळून गेलेल्यांचं काय? नेमकं काय आहे तुमच्या कळसात?
तुमचंच की दुसऱ्यांचं? काही राहत नाही...तुम्ही एक राख असता...एक खाली पडलेली राख...
आणि हा शेवटचं...तुमच्या वाटेला आलेली लाकडं...जी अर्धी जळून जातात...ती ही दुसऱ्याच्या वाटेला जातात...
काय तुझं, काय माझं, काय तुमचं? आणि कसलं काय!!!
सौरभच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. सौरभने 'मीटर डाऊन', 'रुप नगर के चित्ते' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. सौरभने अभिनेत्री योगिता चव्हाणशी लग्न केलं आहे. योगिता आणि सौरभने 'जीव माझा गुंतला'मध्ये एकत्र काम केलं होतं.