अनेक कलाकार हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. बॉलिवूड सोलिब्रिटींप्रमाणेच मराठी कलाकारही सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. नवीन प्रोजेक्टच्या अपडेटसोबतच वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टीही ते चाहत्यांसोबत शेअर करतात. अभिनेता सौरभ चौघुलेदेखील सोशल मीडियावरुन चाहत्यांना अनेक अपडेट देत असतो.
नुकतंच सौरभने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो मेथीची भाजी निवडताना दिसत आहे. अभिनेत्याने ही भाजी निवडण्यासाठी एक भन्नाट ट्रिक वापरली आहे. ती चाहत्यांसोबत त्याने शेअर केली आहे. या व्हिडिओत तो किचनमधला झारा घेऊन त्याच्या सहाय्याने मेथीची भाजी निवडताना दिसत आहे. सौरभने इन्स्टाग्रामवर रील्स पाहून भाजी निवडण्यासाठी ही ट्रिक वापरली आहे. सौरभची ही ट्रिक पाहून त्याची पत्नी योगिताही थक्क झाली आहे. "घेतलेल्या उखाण्यावर खरा उतरलो..."भाजीत भाजी मेथीची योगिता माझ्या प्रीतीची", असं कॅप्शन देत सौरभने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
दरम्यान, सौरभ आणि योगिता जीव माझा गुंतला मालिकेत एकत्र दिसले होते. या मालिकेत त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या ऑनस्क्रीन कपलने गेल्या वर्षी खऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधली. या सेलिब्रिटी जोडीचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे.