सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाने मोठ्या थाटात गणरायाचं स्वागत केलं आहे. त्यामुळे सध्या वातावरणात प्रसन्नता, मांगल्य पसरल्याचं दिसून येत आहे. यात अनेक कलाकार त्यांच्या गणेशोत्सवाच्या काळातील काही बालपणीच्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. यामध्येच 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतील अप्पी अर्थात अभिनेत्री शिवानी नाईक (shivani naik) हिने तिच्या गणेशोत्सवाच्या काळातील आठवणींना उजाळा दिला आहे.
"गणरायाचे आगमन होणार या कल्पनेनेच खूप उत्साह निर्माण होतो. सगळेजण जोरात तयारीला लागतात. माझ्या घरी देवघरातच गणपतीची स्थापना होत असे परंतु, गेल्या वर्षापासून आम्ही अगदी व्यवस्थित सजावट करून गणपतीची स्थापना करतो. दुकानात जाऊन आपला गणपती शोधणे त्याला घरी घेऊन येत असतानाचा पायी प्रवास खूप आनंद देणारा असतो. घरी आल्यावर आई त्याचे अगदी प्रेमाने औक्षण करते. गणरायाला आवडणारे उकडीचे व तळणीचे मोदक तसेच अनेक गोडाचे पदार्थ करून गणपतीला नैवेद्य दाखवला जातो. या वर्षी मी एक दिवसासाठी का होईना घरी जाऊ नक्की बाप्पाला भेटून त्याचा आशीर्वाद घेणार आहे," असं शिवानी नाईकने सांगितलं.
दरम्यान, अलिकडेच छोट्या पडद्यावर 'अप्पी आमची कलेक्टर' ही नवीन मालिका सुरु झाली आहे. अवघ्या काही भागांमध्येच ही मालिका लोकप्रिय ठरताना दिसत आहे. या मालिकेत शिवानीने अप्पी ही मुख्य भूमिका साकारली आहे.