Join us

मराठी अभिनेता अन् अभिनेत्रीचं जुळलं! दणक्यात उडवला लग्नाचा बार, बांधली रेशीमगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 15:46 IST

'कॉन्स्टेबल मंजू' फेम अभिनेता शिवराज नाळे याने अभिनेत्री स्नेहा धडवईशी लग्नगाठ बांधली आहे.

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली आहे. रेश्मा शिंदे, निखिल राजेशिर्के, शाल्व किंजवडेकर, कौमुदी वलोकर, हेमल इंगळे यांच्यानंतर आता आणखी एका सेलिब्रिडी जोडप्याने लग्नाचा बार उडवला आहे. 'कॉन्स्टेबल मंजू' फेम अभिनेता शिवराज नाळे याने अभिनेत्री स्नेहा धडवईशी लग्नगाठ बांधली आहे. 

शिवराज आणि स्नेहाने ७ जानेवारीला कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी प्रीवेडिंगचे फोटो शेअर करत लग्नाची तारीख सांगितली होती. त्यांच्या प्रीवेडिंग फोटोशूटची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. पारंपरिक पद्धतीने शिवराज आणि स्नेहा लग्नाच्या बेडीत अडकले. 

'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेत शिवराज जयदीप सुर्वे ही भूमिका साकारत आहे. तर स्नेहाने काही मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’, ‘सिंधुताई सपकाळ’ या मालिकांमध्ये स्नेहा झळकली होती. शिवराज आणि स्नेहा यांच्या लग्नाला ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेतील बाळकृष्ण शिंदे, अजय तपकिके, विद्या सावळे, नेहा शिंदे, प्रिया करमरकर, निकिता या कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

टॅग्स :सेलिब्रेटी वेडिंगटिव्ही कलाकारमराठी अभिनेता