Join us

"सेटवरील काकांबरोबर माझे संबंध जोडले", आरती सोळंकीचा खुलासा, म्हणाली, "चॅनेलने मला बॅन केलं आणि..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2023 11:21 AM

आरतीला एका चॅनेलमधून काढून टाकलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आरतीने याचा खुलासा केला आहे. 

मराठी अभिनेत्री आरती सोळंकी तब्बल ५० किलो वजन घटवल्यामुळे चर्चेत आली होती. अनेक मालिका आणि कॉमेडी शोमध्ये अभिनयाचा ठसा उमटवत आरतीने मराठी कलाविश्वात स्वत:चं स्थान निर्माण केलं. अभिनेत्रींची झिरो फिगरच असली पाहिजे, हा विचार मोडित काढणाऱ्या अभिनेत्रींपैकी आरती सोळंकी एक आहे. पण, कलाविश्वात अभिनेत्री म्हणून स्थान निर्माण करणं आरतीसाठी सोपं नव्हतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आरतीने याचा खुलासा केला आहे. 

आरतीला एका चॅनेलमधून काढून टाकलं होतं. "ते चॅनेल आणि त्यातील माणसंही माझ्यावर खूश होती. पण, कलाकार खूश नव्हते. त्या चॅनेलच्या प्रत्येक कार्यक्रमाला मला बोलवलं जायचं. मला ओळख त्या चॅनेलमुळे मिळाली. म्हणून मला त्या चॅनेलचं नाव घ्यायचं नाही. कारण, त्या चॅनेलने मला मुद्दाम बॅन केलं नव्हतं. काही लोकांमुळे गैरसमज निर्माण झाल्यामुळे चॅनेलने तसं केलं. या गोष्टी नंतर मला समजल्या. चॅनेलने बॅन केल्यामुळे मी नैराश्यात गेले होते. त्यामुळे तेव्हा मी त्यांना काही विचारलं नाही किंवा सांगायलाही गेले नाही. आजपर्यंत या गोष्टी क्लिअर झालेल्या नाहीत," असं आरती 'इट्स मज्जा'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. 

पुढे ती म्हणाली, "त्या सेटवर माझा खूप अपमान व्हायचा. सगळ्या कलाकारांमध्ये मी वयाने, अनुभवाने आणि परिस्थितीनेही लहान होते. त्यामुळे मी सेटवर फक्त माझ्या रुममध्ये असायचे. कोणाशी फारसा बोलायचा वगैरेही मी प्रयत्न करायचे नाही. हे सगळ्यांना खूप आवडायचं. पण, पहिल्यापासूनच तिथे माझा खूप अपमान व्हायचा. नंतर अशा गोष्टी घडल्या, ज्या मला सहन झाल्या नाहीत. मी सुरुवातीला परफ्युम वापरत नव्हते. पण, नंतर मी सेटवर घामाचा वास येऊ नये, म्हणून वापरायला लागले. तेव्हा मग कोणीतरी म्हणायचं रस्त्यावर ३० रुपयांनाही परफ्युम मिळतं. जेवायला बसल्यानंतरही मला बोललं जायचं. काही लोकांना जेवायला मिळत नाही, तर ठेवावं लागतं, असंदेखील म्हटलं जायचं." 

"तेव्हा माझ्याकडे पैसे नसल्यामुळे दोन जीन्स आणि तीन-चार सदरे होते. तर आमच्या सेटवरचे इस्त्रीवाले काका माझे कपडे थोडे चांगले वाटावे, म्हणून इस्त्री करायचे. इतर कलाकारांचे ते करायचे नाहीत. कारण, त्यांचे कपडे चांगले असायचे. ते काका माझे कपडे इस्त्री करायचे म्हणून त्यांचाबरोबर माझे संबंध जोडले होते. एका अभिनेत्रीने म्हटलं होतं की काही नाही रे दिलं की कोणीही करतं. यामुळे मला धक्का बसला होता. पण, मला सेटवर काय त्रास होतोय हे चॅनेल वाल्यांना माहीत नव्हतं," असंही आरतीने सांगितलं. 

टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकार