Join us  

प्रेग्नंन्सीनंतर अदिती सारंगधरला आलं होतं डिप्रेशन; म्हणाली- "नवऱ्याबरोबर भांडण व्हायचं..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 3:29 PM

प्रेग्नंन्सीनंतर डिप्रेशनमध्ये गेली होती अदिती सारंगधर, म्हणाली- "बाळ झाल्यानंतर..."

अदिती सारंगधर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. पण, 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेमुळे अदिती प्रसिद्धीझोतात आली. अदिती अभिनयाबरोबरच तिच्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने करिअर आणि वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं. या मुलाखतीत प्रेग्नंन्सीनंतर आलेल्या डिप्रेशनबद्दलही तिने भाष्य केलं. 

अदितीने नुकतीच 'आरपार ऑनलाईन' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, "गरोदरपणानंतर मला डिप्रेशन आलं होतं. बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की प्रेग्नंन्सीनंतरही डिप्रेशन येतं. कधीही रडू येतं. मूड स्विंग्स होतात. लोकांना वाटतं की हे नॉर्मल आहे. पण, ते तसं नसतं. मला आवर्जुन सांगावंसं वाटतं की बाळंतीण झालेल्या बाईची काळजी घ्या. ती आनंदी असेल तर मुलाची काळजी ती घेणारच आहे. त्याला ती वाऱ्यावर सोडणार नाही. माणसं फक्त बाळाला बघायला येतात. आईला कोणीच बघायला येत नाही. तिनेही तेवढंच सोसलेलं असतं. मी बाळाला कोणाच्याही हातात द्यायचे नाही. त्याला इन्फेक्शन झालं तर त्याला सांभाळायला कोणी येणार नाही. माझ्या मदतीला कोणी नव्हतं. आई किंवा सासूबाई नाहीत. वडील होते पण ते आजीला सोडून येऊ शकत नव्हते. मला सासरेही नव्हते. त्यामुळे कुटुंबातील अनुभवी आणि शिक्षित असं कोणीच नव्हतं". 

"बाळाला खिडकीतून टाकणार आणि मी पण उडी मारणार, अशी परिस्थिती आली होती. मी खिडकी लावून घेतली आणि म्हटलं की आजपासून खिडकीच्या बाहेर जायचं नाही.  मग मी काउन्सिलरकडे गेले. काही सेशन्सनंतर मी तिच्याकडे गेले तेव्हा त्या मला म्हणाल्या की तू जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे आली होतीस. तेव्हा मी प्रार्थना केली होती की ही बाई उद्या जिवंत माझ्याकडे येऊ दे. इतकं डिप्रेशन मला आलं होतं. तोपर्यंत मला डिप्रेशन असतं असं काही माहितच नव्हतं. नंतर मला कळायला लागलं की मी स्वच्छंदी होते. माझ्या मर्जीने सगळ्या गोष्टी करायचे. मर्जीने उठायचं, झोपायचं...पण, बाळ झाल्यानंतर हे सगळं बदलतं. त्याच्या सोईने सगळ्या गोष्टी ठरतात. हे कुठेतरी मला स्वीकारता येत नव्हतं. आणि याची तयारी झाली नव्हती. आई होण्यासाठी मी तयार नव्हते. मला आयुष्यात मूलच नको होतं. पण, नवऱ्याला हवं होतं. त्यामुळे आम्ही आईबाबा होण्याचा निर्णय घेतला. मी सुरुवातीला उत्सुकही होते", असं ती म्हणाली. 

पुढे अदितीने यातून स्वत:ला कसं बाहेर काढलं, याबाबतही भाष्य केलं. ती म्हणाली, "मला यातून बाहेर पडायचं होतं. मग मी धावायला सुरुवात केली. सुरुवातीला मला रडू यायचं. पण, ही नकारात्मकता जाणं गरजेचं होतं. घरी गेल्यानंतर मी खूप आनंदी असायचे. मला इतकं डिप्रेशन आलं होतं की माझं नवऱ्याशी भांडण व्हायचं. चिडचिड व्हायची. आणि हे समजून घेणारं कोणीच नव्हतं. दुर्देवाने माझ्या नवऱ्याला सांगणारही कोणी नव्हतं. त्यामुळे त्यालाही कळत नव्हतं. जवळपास वर्षभरानंतर मी यातून बाहेर पडले. आता आम्ही जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा कळतं की आपण कसे वागलो. पण, बाईला प्रेग्नंन्सीनंतर असा त्रास होऊ शकतो, हे लोकांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे".

टॅग्स :टिव्ही कलाकारप्रेग्नंसीसेलिब्रिटी