सोशल मीडिया सेन्सेशन आणि मॉडेल पूनम पांडे चर्चेत आहे. शुक्रवारी(२ फेब्रुवारी) पूनमच्या इन्स्टाग्रामवरुन तिचं निधन झाल्याची पोस्ट करण्यात आली होती. सर्व्हायकल म्हणजेच गर्भाशयाच्या कॅन्सरने तिचा मृत्यू झाल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं गेलं होतं. ३२ वर्षीय पूनमचा कॅन्सरने मृत्यू झाल्याने चाहत्यांनाही धक्का बसला होता. पण, शुक्रवारी सकाळी इन्स्टा लाइव्हवरुन पूनमने ती जिवंत असून तिचा मृत्यू गर्भाशयाच्या कॅन्सरने झाला नसल्याचं सांगितलं. सर्व्हायकल कॅन्सरच्या जनजागृतीसाठी हे नाटक केल्याचंही पूनमने सांगितलं. तिच्या या जनजागृती स्टंटनंतर पूनमला ट्रोल केलं जात आहे.
पूनम पांडेच्या निधनाच्या बातमीनंतर सर्व्हायकल कॅन्सरबद्दल लोक जाणून घेत होते. पूनमच्या आधी मराठी अभिनेत्री अक्षया देवधरनेही गर्भाशयाच्या कॅन्सरच्या लसीबद्दल जनजागृती केली होती. पण, यासाठी अक्षयाला कुठलाही स्टंट करण्याची गरज भासली नव्हती. अक्षयाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत तिने गर्भाशयाच्या कॅन्सरवरील लस HPV बद्दल सांगितलं होतं. आता अक्षयाच्या या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
"सध्या कॅन्सरचं प्रमाण सगळीकडेच वाढत चाललं आहे. महिलांमध्ये सर्व्हायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर हे कॅन्सरचे दोन प्रकार मुख्यत्वे आढळतात. यावर उपाय काय, असा प्रश्न आपल्याला कायमच पडतो. तर सर्व्हायकल कॅन्सरवर एक लस आलेली आहे. ज्याचं नाव HPV व्हॅक्सिन असं आहे. या व्हॅक्सिनच्या तीन डोसचा कोर्स आपल्याला घ्यावा लागतो. हे व्हॅक्सिन येऊन आता बराच काळ झाला आहे. पण, मला ही गोष्ट माहीत नव्हती, याचा खेद वाटतो. तरीसुद्धा याबाबत अजूनही महिलांना माहिती नाही. मला माहीत झाल्यानंतर मी या व्हॅक्सिनचे डोस घेतले आहेत. ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचली गेली पाहिजे. ही माहिती सगळ्या महिलांपर्यंत पोहोचवा. स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही व्हॅक्सिन घेऊ शकता. वयाच्या ९व्या वर्षापासून हे व्हॅक्सिन घेता येतं. त्यामुळे मुलींना याचा जास्तीत जास्त फायदा होईल," असं म्हणत अक्षयाने व्हिडिओ शेअर केला होता.
आता अक्षयाचा हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत तिचं कौतुकही केलं आहे. ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवल्याबद्दल अक्षयावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.