मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव कमावणारी गुणी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. 'चंद्रमुखी' अशी ओळख मिळवलेली अमृता अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. अमृता एक उत्तम नृत्यांगणाही आहे. चित्रपटांबरोबरच अनेक रिएलिटी शोमध्ये ती परिक्षकाच्या भूमिकेत होती. अमृता अवधूत गुप्तेच्या 'खुपते तिथे गुप्ते'च्या नव्या भागात हजेरी लावणार आहे. या भागाचे काही प्रोमो व्हिडिओ समोर आले आहेत.
'खुपते तिथे गुप्ते'मध्ये अवधूत गुप्तेने विचारलेल्या प्रश्नांची अमृता दिलखुलासपणे उत्तर देताना दिसत आहे. याबरोबरच वैयक्तिक आणि मनोरंजनविश्वातील करिअरबाबतही अमृताने या शोमध्ये भाष्य केलं. या शोमध्ये तिने बालपणीचा एक किस्साही शेअर केला. अमृताने शाळेत असताना रस्त्यातच एका व्यक्तीची धुलाई केली होती. हा प्रसंग सांगताना ती म्हणाली, "आम्ही कुठून तरी येत होता. तेव्हा मी सातवी-आठवीत असेन. मी शाळेच्याच कपड्यावर होते. बॅग आणि गळ्यात प्लास्टिकची बाटलीही होती. एक मारुती सुझुकीवाला आम्हाला आडवा गेला. माझ्या पप्पांची उंची ५.२ फूट इतकी आहे. पण, त्यांना नेहमी आपण कुणाला तरी धरुन मारुन शकतो वगैरे असं वाटायचं."
"त्यानंतर माझ्या पप्पांनी त्याला पुणेरी भाषेत सुनावलं. तो माणूस पुढे जाऊन थांबला आणि गाडीतून उतरला. त्याची उंची ६ फूटवगैरे होती. काय बोलला असं म्हणत त्याने माझ्या पप्पांना उचललं. त्यानंतर मग मी त्या माणसाच्या अंगावर उडी घेतली. माझ्या हातातील प्लास्टिकची बॉटल त्याच्या डोक्यावर आपटून मी रडत होते. माझ्या पप्पांना तो काय करतोय, अशी मला भीती होती. असे खूप किस्से आहेत. कारण, मी कधीच कोणाचं ऐकून घेतलं नाही," असं म्हणत अमृताने तिच्या बालपणीचा हा किस्सा शेअर केला.
अमृताने अनेक मराठी चित्रपटांत काम केलं आहे. 'हर हर महादेव' या चित्रपटात अमृता ऐतिहासिक भूमिकेत दिसली होती. तिने या चित्रपटात सोनाबाई देशपांडे ही भूमिका साकारली होती. 'राझी', 'सत्यमेव जयते' या चित्रपटांत महत्त्वाची भूमिका साकारुन अमृताने बॉलिवूडमध्येही नाव कमावलं.