Join us

"किती दुर्लक्ष करायचं?" अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 1:22 PM

कालच्या घटनेनंतर मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली अस्वस्थता

दहीसरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवर अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर काल सोशल मीडिया लाईव्ह सुरु असतानाच गोळीबार झाला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सध्या महाराष्ट्रात गोळीबाराच्या घटना वाढतच आहेत. नक्की चाललंय काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. भरदिवसा गोळीबार सुरु असून त्याचं फुटेजही समाजमाध्यमात पसरत आहे. यामुळे साहजिकच दहशत निर्माण झाली आहे. या घटनांवर आता प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनेही संताप व्यक्त केला आहे.

अभिषेक घोसाळकर काल संध्याकाळी आपल्या दहीसर येथील कार्यालयातून फेसबुक लाईव्ह करत होते. यावेळी त्यांच्यासोबत मॉरिस भाई हा देखील होता. दोघंही यापूर्वी एकमेकांचे कट्टर शत्रू होते. मात्र फेसबुक लाईव्ह करत त्यांनी वैर संपवत आम्ही पुन्हा मैत्री करत आहोत अशी माहिती दिली. तसंच ते महिलांना साड्यांचे वाटपही करणार होते. लाईव्ह संपवून अभिषेक घोसाळकर उठले तेवढ्यात मॉरिसने त्यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या. तसंच स्वत:लाही गोळी मारत आत्महत्या केली. या घटनेने मुंबई हादरली आहे आणि सर्वसामान्यांमधून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. भगरे गुरुजींची लेक आणि लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अनघा अतुलने (Anagha Atul) इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत संताप व्यक्त केला आहे. तिने लिहिले, "आपल्या आजूबाजूला हे नक्की चाललंय काय? अशा बातम्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. आपण नक्की किती दुर्लक्ष करायचं?"

अनघा अतुलने तिच्या पोस्टमध्ये अभिषेक घोसाळकर यांचा तो शेवटचा व्हिडिओही शेअर केला आहे. कालच्या घटनेमुळे ती स्वत: खूप डिस्टर्ब झाल्याचं दिसतंय. तिने जाहीरपणे अस्वस्थता मांडलेली दिसतेय. सध्या अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा आणि मॉरिस भाईच्या आत्महत्येचा प्रकरणात तपास सुरु आहे. तसंच याप्रकरणी दोन जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे.

टॅग्स :मराठी अभिनेताअभिषेक घोसाळकरटिव्ही कलाकारसोशल मीडिया