अगदी अलीकडे ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अनिता दातेने (Anita Date) एक फोटो शेअर केला होता. ‘जो आवडते सर्वांना...,’ असं कॅप्शन देत अनिताने शेअर केलेल्या या फोटोमुळे खळबळ माजली होती. यात तिच्या फोटोला हार घातल्याचे दिसून आले होते. तिचा हा फोटो पाहून चाहत्यांना आणि कलाकारांना धक्का बसला होता. काहींनी तर अनिताचं निधन झालं असं समजून आरआयपीच्या कमेंट्स लिहायला सुरूवात केली होती. पण आता या फोटोमागचं कारण समोर आलं आहे.हार घातलेला फोटो हे दुसरं तिसरं काही नसून नव्या मालिकेतील तिच्या तिच्या या खट्याळ पात्राचं प्रमोशन होतं. होय, अनिता दातेची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येतेय आणि या मालिकेच्या प्रमोशनसाठी तिने ही शक्कल लढवली होती.
अनिता दातेची नवी मालिका...‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत गुरुनाथला धडा शिकवणारी 300 करोडची मालकीण राधिका आता नव्या कोऱ्या मालिकेत एकदम अतरंगी भूमिकेत दिसून येणार आहे. झी मराठीवर ही नवी मालिका सुरू होतेय. ‘नवा गडी नवं राज्य’ असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेद्वारे अनिता दाते पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. मालिकेत अनिता दातेचं पात्र या जगात नसल्याचं दाखवण्यात आलं आहे. पण तरिही तिचं पात्र महत्त्वपूर्ण असणार आहे. एका खोडकर भूमिकेत ती पहायला मिळणार आहे. घरावर राज्य असणाऱ्या एकीचा संसार अर्धवट राहतो आणि तो पूर्ण करण्यासाठी दुसरी बायको घरात येते. त्यामुळे या मालिकेला ‘नवा गडी नवं राज्य’ ’ (Nava Gadi Nava rajya new serial) असं नाव देण्यात आलं आहे.
मालिकेचा प्रोमो रिलीज मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. ‘जीव लावला की संसारातला प्रत्येक डाव जिंकता येतो... त्या दोघींच्या संसाराची एक गोड गोष्ट...,’ अशा कॅप्शनसह हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या मालिकेत अनिता दाते हिच्याशिवाय कश्यप परुळेकर, पल्लवी पाटील, वर्षा दांदळे अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे. अनिता दाते ही रमा नावाचं पात्र साकारते आहे आणि पल्लवी पाटील ही आनंदीच्या भूमिकेत असणार आहे.
रमाच्या जाण्यानंतर तिचा नवरा दुसरं लग्न करतो आणि आनंदी नवी बायको बनून घरात येते. रमाचा अर्धवट राहिलेला संसार सावरायला आलेल्या आनंदीला मात्र घरातून फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. रमा आणि आनंदीमधला एक खोडकर संवाद दाखवला आहे. ज्यात रमा आनंदीला हे पटवून देत आहे की आज तिच्या जाण्यानंतर सुद्धा तिची जागा कोणीच घेऊ शकलेलं नाही तर दुसरीकडे आनंदी मात्र हा ठाम निश्चय करून आली आहे की सगळ्यांना आपलंस करून त्यांचं मन जिंकूनच दाखवेन..घरात आलेल्या या नव्या आनंदीचा स्वीकार आता वेगवेगळ्या नात्यांमध्ये होणार का? तिच्यावर आलेलं हे राज्य ती पेलू शकणार का? आणि रमा या सगळ्यात मोडता घालणार का मदत करणार हे पाहणं गंमतशीर ठरणार आहे.