छोट्या पडद्यावर सध्या अनेक नवनवीन मालिकांचा रेलचेल पाहायला मिळत आहे. या मालिकांच्याच गर्दीमध्ये आता लवकरच इंद्रायणी ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका चिमुकल्या लहान मुलीचं बालविश्व या मालिकेतून उलगडलं जाणार आहे. सध्या सोशल मीडियावर या मालिकेचे अनेक प्रोमो व्हायरल होत आहेत. त्यामुळे या चिमुकल्या इंदूला भेटण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. यामध्येच ही चिमुकली इंदू नेमकी आहे तरी कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
इंद्रायणी या मालिकेत सांची भोईर या चिमुकलीने इंदूची भूमिका साकारली आहे. सांची ही मूळची साताऱ्याची आहे. या मालिकेत सांचीसोबतच लोकप्रिय अभिनेत्री अनिता दाते आणि संदीप पाठकदेखील स्क्रीन शेअर करणार आहेत.
दरम्यान, या मालिकेची कथा चिन्मय मांडलेकर याने लिहिली आहे. तर दिग्दर्शन विनोद लव्हेकर यांनी केलं आहे. नुकतंच या मालिकेचं सुरेख शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गीत तुझं डोलण्याचं, वाऱ्यासंगं हालण्याचं..पाखरांशी बोलण्याचं, चांदण्यात चालण्याचं!! “ असे या शीर्षकगीताचे बोल असून त्यातून इंदूचं भावविश्व उलगडण्यात आलं आहे. हे शीर्षकगीत गीतकार, कली दासू वैद्य यांनी लिहिलं असून ए. व्ही. प्रफूल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलं आहे. ही मालिका वाहिनी कलर्स मराठीवर २५ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.