Join us

EXCLUSIVE : "तू हिरोईन मटेरियल नाही", मराठमोळ्या अभिनेत्रीला दिसण्यावरून हिणवलं; व्यक्त केली खंत

By ऋचा वझे | Published: April 08, 2024 11:43 AM

मराठी इंडस्ट्रीतही आहे 'हिरोईन मटेरियल'चा आग्रह, म्हणाली...

हिंदी फिल्म इंडस्ट्री असो किंवा मराठी कुठेही कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात तुम्ही या क्षेत्रात अगदीच नवीन असाल तर चांगल्या संधीसाठीही खूप वाट पाहावी लागते. तेवढे पेशन्स तुमच्यात असावे लागतात. नकारही पचवावे लागतात. मराठी अभिनेत्री आरती मोरेने (Arti More) तिला आलेले असेच अनुभव सांगितले आहेत. थिएटर ते मालिकेत मुख्य भूमिका असा प्रवास करणाऱ्या आरतीला कोणत्या कारणांमुळे नकार ऐकावे लागले आहेत हे तिने नुकतंच 'लोकमत फिल्मी' ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 

आरती मोरे सध्या स्टार प्रवाहवरील 'पिंकीचा विजय असो' मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच तिची या मालिकेत एन्ट्री झाली. तिचा पहिलाच प्रोमो चांगलाच गाजला होता. अनेकांनी तिचं कौतुक केलं. पण आरतीचा हा प्रवास सोपा नव्हता. संघर्षकाळात तिने अनेक ठिकाणी ऑडिशन्स दिल्या. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत आरती म्हणाली, "हो, मी खूप रिजेक्शन ऐकलेत. माझा चेहरा 'हिरोईन मटेरिअल' नाही असं मला अनेकदा म्हटलं गेलंय. अगदी ऑडिशन आवडली असूनही मला नकार दिला गेलाय. म्हणजे साऊथमध्ये अगदी साधा चेहरा, चपट्या नाकाच्या जरी असल्या तरी त्या तिथल्या हिरोईन असतात. पण आपल्याकडे सौंदर्याची प्रमाणभाषा वेगळी आहे. Heroine सारखाच face असला पाहिजे हा आग्रह असतो. रोजच्या व्यवहारातले चेहरेही हिरोईन असू शकतात. त्यामुळे मला नकार पचवावे लागले आहेत. पण तरी मी लीडसाठी ऑडिशन देणं थांबवलं नाही. मला नंतर ज्या भूमिका मिळाल्या ते सगळंच मी मनापासून केलं. पण तरी कोणाला वाटत नाही आपण एखाद्या नाटकाची, सिनेमाची मुख्य अभिनेत्री असावं."

ती पुढे म्हणाली, 'तरी हिंदीत आता हे चित्र हळूहळू बदलतंय. हिरोईनची व्याख्या बदलत आहे. शिवाय सोशल मीडिया फॉलोअर्स हा मुद्दाही आजकाल फार मोठा आहे. माझ्यासमोर फॉलोअर्स कमी आहेत त्यामुळे तुला नाही घेऊ शकत अशा चर्चा झाल्या आहेत."

आरती मोरेने थिएटरपासून तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. 'नाटक' हेच तिचं पहिलं प्रेम. मालिका करत असतानाच एखादं नाटकही सुरु ठेवायचं असाच तिचा नेहमी प्रयत्न असतो. आताही आरती 'दादा एक गुडन्यूज आहे' नाटकात काम करत आहे.  आरतीने 'लोकमान्य', 'जय मल्हार' या मालिकांमध्येही काम केलं आहे. 

टॅग्स :आरती मोरेमराठी अभिनेताटेलिव्हिजनटिव्ही कलाकार