सध्या राज्यभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पुन्हा उपोषणास बसले आहेत. आतापर्यंत राज्यभरात शांततेत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आता कलाकारही भाष्य करत आहे. अभिनेता रितेश देशमुखने ट्वीट करत मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला होता. आता मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेनेही मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला आहे.
अश्विनीने मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू असलेल्या ठिकाणी भेट दिली. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. "आता नाही तर कधीच नाही. विद्यार्थी..स्वप्नं..मेहनत..परीक्षा..उत्तीर्ण...यश... तरीही अपयश..मग आक्रोश..यातना..मग परत परीक्षा..मग परत सगळे तेच आधीचे पाढे आणि मग आत्महत्या....हे गेले किती तरी वर्ष सुरू आहे आणि या पुढे हे होणार नाही यासाठी उभे राहायला हवे. या लढ्यात मी भाग होणे हे माझे कर्तव्य आहे," असं तिने व्हिडिओत म्हटलं आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत अश्विनीचं कौतुकही करत आहे.
अश्विनी सोशल मीडियावर सक्रिय असून अनेक समाजपयोगी कार्यक्रमांत सहभागी होत असते. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतून अश्विनी घराघरात पोहोचली. या मालिकेतील राणू अक्काची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. सध्या अश्विनी 'आई कुठे काय करते' मालिकेत काम करत आहे. 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटांतही ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. लवकरच ती 'अहिल्याबाई होळकर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.