मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी(hemangi kavi). कलाविश्वात सक्रीय असण्यासोबतच हेमांगी सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टीव्ह आहे. त्यामुळे समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर ती उघडपणे व्यक्त होत असते. यात अनेकदा ती बेधडकपणे तिची मतंही मांडते. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तिची कायम चर्चा रंगत असते. सध्या सोशल मीडियावर हेमांगीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हेमांगीने तिच्या आईची एक गोड आठवण शेअर केली आहे.
हेमांगीची मुख्य भूमिका असलेली 'लेक माझी दुर्गा' ही मालिकेत येत्या १४ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र या मालिकेची चर्चा रंगली आहे. यामध्येच हेमांगीने या मालिकेच्या निमित्ताने तिच्या आईची आठवण शेअर केली आहे. एकेकाळी तिची आई दुर्गा होऊन तिच्या पाठिशी खंबीरपणे कशी उभी राहिली होती हे तिने सांगितलं आहे.
"मंडळी आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग, क्षण येतात जेथे आपली वाटणारी माणसं आपली साथ सोडून जातात.पण, एक व्यक्ती अशी असते जी कायम आपल्या सोबत राहते, साथ देते ती म्हणजे आपली आई. माझी सुद्धा आई अशीच आहे. कलावती कवी. त्याकाळी म्हणजे २०-२२ वर्षांपूर्वी २००१चा काळ असेल. त्या काळी ७ च्या आत मुलींनी घरी येणं बंधनकारक होतं. पण, त्यावेळी मी नुकतीच एकांकिका, नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी अनेकदा आम्हाला हॉल मिळायचा नाही, किंवा दिवसभर गोंगाट असायचा त्यामुळे आम्ही संध्याकाळी रिहर्सल करायचो. म्हणून मी साधारणपणे सात वाजल्यानंतर घरातून बाहेर पडायचे आणि रात्री दीड-दोन वाजता घरी यायचे. दुसऱ्या दिवशी आपले हितचिंतक म्हणजेच सो कॉल्ड शेजारी माझ्या आईला विचारायचे, काय हो तुमची तरुण मुलगी संध्याकाळी बाहेर पडते आणि रात्री वेगवेगळ्या मुलांसोबत घरी येते. पण, अशा वेळी माझी आई दुर्गेसारखी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली", असं हेमांगी म्हणाली.
पुढे ती म्हणते, "माझी आई त्यांच्याशी भांडायची, लढायची. त्यांना सांगायची माझी मुलगी काय करते, कोणासोबत जाते हे सगळं आम्हाला माहितीये. तुम्ही त्याची काळजी करु नका. त्या मुलांसोबत आमची भेट करुन दिलीये आणि ती माणसं विश्वासातली आहेत. आणि, माझी मुलगी कोणतंही गैरप्रकार करत नाहीये. तू अभिनय क्षेत्रात नशीब आजमावतीये. तिला तिचं नशीब आजमावू दे. आईचे हे पाठिशी राहणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. माझी आई सातवी पास आहे. कोणी फार शिकलेली बाई नाही, गावातली बाई आहे. पण, त्यावेळी ती माझ्या पाठिशी उभी राहिली नसती तर, आज मी इथे नसते. त्यावेळची परिस्थिती खरंच खूप वेगळी होती. आता पालक मुलांना प्रोत्साहन देतात. मुलांसोबत ठिकठिकाणी जातात. पण, तेव्हा तसं नव्हतं. माझी सातवी पास आई कुठे माझ्यासोबत येणार होती.मात्र, त्यावेळी तिने मला विश्वासाने पाठवलं आणि सगळ्या समाजासोबत लढली."
दरम्यान, हेमांगीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओसोबतच तिने प्रेक्षकांनादेखील आईच्या काही गोड आठवणी शेअर करा असं आवाहन दिलं आहे.