छोट्या पडद्यावरील लोभसवाणा चेहरा म्हणजे जुई गडकरी. 'पुढचं पाऊल' या लोकप्रिय मालिकेतून जुई प्रत्येक मराठी घराघरात पोहोचली. त्यामुळेच आज लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं. परंतु, जुईचा कलाविश्वातील हा प्रवास सोपा नव्हता. विशेष म्हणजे अभ्यासात हुशार असलेली जुई एका खास व्यक्तीच्या सांगण्यावरुन मराठी कलाविश्वात आली. महिला दिनाच्या निमित्ताने तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये या खास व्यक्तीचा उल्लेख केला आहे.
जुई गडकरीने 'लोकमतच्या वूमन्स डे स्पेशल' या सेगमेंटमध्ये तिची इन्स्पिरेशन असलेली व्यक्ती कोण हे सांगितलं. सोबतच तिने अन्य स्त्रियांनाही या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलत असताना तिने कोणत्या व्यक्तीच्या सांगण्यावरुन तिने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं हे सांगितलं.
"माझ्या आयुष्यात माझं इन्स्पिरेशन कोण? असं मला विचारलं. तर, मी सांगेन की ती व्यक्ती माझी आई आहे. कारण, आजवर मी माझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी केल्या आहेत. मग त्या पर्सनल लाइफमधल्या किंवा प्रोफेशनल लाइफमधल्या ते तिच्या मार्गदर्शनाने केल्या. तिने मला घडवलं आहे. त्यामुळे या जगातली एकदम बेस्ट पर्सन म्हणजे ती आहे माझ्यासाठी. प्रत्येकासाठीच त्यांची आई असते. लहानपणापासून मी तिला पाहात आले. ती घर आणि ऑफिस या दोन्ही आघाड्या व्यवस्थित सांभाळत आली आहे. एकंदरीतच सगळ्याच बाबतीत ती खूप स्ट्राँग आहे", असं जुई म्हणाली.
पुढे ती म्हणते, "मला सुद्धा तिनेच आकार दिला आहे. मला या फिल्डमध्ये येण्यासाठीही तिनेच सांगितलं होतं. त्यामुळे ती माझ्यासाठी इन्स्पिरेशनल वूमन आहे." दरम्यान, या स्पेशल व्हिडीओमध्ये जुईने तिला लता मंगेशकर यांच्या बायोपिकमध्ये लता दीदींची भूमिका साकारायला आवडेल असंही सांगितलं.