रस्त्यावरील मुक्या प्राण्यांना त्रास देणं, त्यांच्यावर अत्याचार करणं या घटना बऱ्याचदा समोर येतात. कालच रितेश देशमुखने 'पीपल फॉर अॅनिमल'या इन्स्टाग्राम पेजवरील एक व्हिडिओ शेअर करत संतप्त पोस्ट लिहिली. यामध्ये एक व्यक्ती कुत्र्याला वाईट पद्धतीने मारताना दिसत आहे. रितेशने 'या व्यक्तीला अटक करा' अशा पद्धतीची पोस्ट केली. रितेशनंतर आता मराठी अभिनेत्री जुई गडकरीनेही (Jui Gadkari) याविरोधात आवाज उठवला आहे.
जुईची संतप्त पोस्ट
मुक्या श्वानाला क्रूरतेने मारहाण करताना पाहून जुई गडकरी म्हणाली, "पेट स्पामध्ये कुत्र्याला अतिशय वाईट पद्धतीने मारतानाचा व्हिडिओ खूप डिस्टर्ब करणारा आहे. मी पूर्ण व्हिडिओही पाहू शकले नाही. पण तो जो कोणी क्रूर माणूस आहे त्याला देव बघून घेईलच. ज्या हातांनी कुत्र्याची ही अवस्था केली ते हात लवकरच काही कामाचे राहणार नाहीत. त्याला अटक झाली पाहिजे.ते पिल्लू सुरक्षित असेल अशी आशा आहे. तुमच्या पाळीव प्राण्यांना कधीच क्लिनिक, स्पा अशा ठिकाणी एकटं सोडू नका."
सोशल मीडियावर नेहमीच सेलिब्रिटी मुक्या प्राण्यांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवताना दिसतात. तसंच काही संस्था क्रूर लोकांना जगासमोर आणतात आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करतात. तरी अजूनही दिवसेंदिवस अशा घटना समोर येतच आहेत. यावर आता पोलिसही कारवाई करत आहेत.
याला अटक करा! कुत्र्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर संतापला रितेश देशमुख
जुई गडकरी सध्या 'ठरलं तर मग' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. यामध्ये तिची आणि अर्जुनची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे.