मराठी कलाविश्वातील गुणी आणि सालस अभिनेत्री म्हणजे कविता मेढेकर. चार दिवस सासूचे, एका लग्नाची दुसरी गोष्ट अशा अनेक गाजलेल्या नाटक, मालिकांच्या माध्यमातून कविता मेढेकर यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. विशेष म्हणजे कायम गुणी, संस्कारी सुनेची वा पत्नीची भूमिका करणाऱ्या कविता पहिल्यांदाच एका करारी भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर आल्या. तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेत भुवनेश्वरी ही भूमिका साकारून त्यांनी त्यांच्या अभिनयाची एक नवी बाजू प्रेक्षकांना दाखवून दिली. सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे कविता यांनी त्यांच्या घरातील गणपतीचा एक किस्सा सांगितला आहे.
''आमच्या मेढेकर घराण्यात पारंपरिक गौरी गणपतीची वर्षानुवर्षे स्थापना होत आली आहे. दरवर्षी आमच्या घरी खूप जल्लोषाने आम्ही बाप्पाचे स्वागत करतो. गौरी गणपती म्हटलं की छान प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळतं. आपले दूरचे नातेवाईक आपल्या घरी येतात त्यामुळे खूप खेळीमेळीचे वातावरण असते. सगळे मोदक आणि प्रसाद बनवण्यासाठी खूप उत्साही असतात. आधी मी आणि माझ्या सासूबाई सगळं सांभाळून घ्यायचो, माझ्या सासूबाईंच्या निधनानंतर माझ्या सास-यांनी मला विचारले कि तुझ्या कामाच्या व्यापात तुला सगळं सांभाळायला जमेल का? पण मी ते आव्हान स्वीकारलं आणि मनाशी ठरवले की जो पर्यंत करता येईल तो पर्यंत व्यवस्थित नेहमी प्रमाणे सगळ्या गोष्टी करायच्या'', असं कविता मेढेकर म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, "मला खूप अभिमान वाटतो की माझ्या सास-यांनी ती जबाबदारी माझ्याकडे दिली. आमच्या पारंपरिक गणपतीची सेवा करण्यास खूप खूप समाधान मिळतं. अगदी ह्या वर्षी सुद्धा 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका आणि 'एका लग्नाची पुढची गोष्ट' हे नाटक इतक्या व्यस्त शेड्युलमुळे सगळं नीट जमेल की नाही याची धाकधुक होती, पण माझ्या दोन्ही निर्मिती संस्था आणि झी मराठी वाहिनी यांनी खूप सांभाळून घेतलं आणि सगळं कसं व्यवस्थित झालं. मी बाप्पाच्या आगमनाची खूप आतुरतेने वाट बघत आहे. गणपती बाप्पा मोरया .. मंगल मूर्ती मोरया.''