मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी केतकी चितळेचा एक एपिसोड चांगलाच गाजला होता. एका वादग्रस्त फेसबुक पोस्टमुळे केतकीला तुरुंगाची हवा खावी लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणं केतकीला महागात पडलं होतं. तिच्याविरोधात राज्यभरात 22 एफआयआर दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी अटक झाल्यानंतर केतकी 41 दिवस तुरूंगात होती. आता पुन्हा एकदा चर्चा आहे ती केतकीच्या नव्या पोस्टची. केतकीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने अंदनाम येथील तुरूंगाचाही उल्लेख केला आहे.
केतकीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती समुद्र्रकिनारी बसली असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले,‘ 10 वर्षापूर्वी अंदमान तुरूंग बघितला. अंगावर काटा आला होता बघून. फक्त समुद्राचा आवाज (आणि सह कैदी कदाचित), एका बाजूला 10 फुटावर छोटीशी खिडकी आणि दुसºया बाजूला बॅरेकचे दार. ती कडी बघून तेव्हा जोक केला होता की ही कडी नाही कडा आहे, कुलुपाची गरज काय! 10 वर्षानंतर जेव्हा मला तुरूंगात टाकले गेले, तेव्हा तशीच कडी, बॅरेकचे दार व खिडकी एकाच बाजूला. समुद्राचा आवाज नव्हता. पण आता समुद्राकडे बघितल्यावर फक्त हेच ऐकू येते!’
अनेकांनी तिच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. तू खंबीर आहेस, अशीच खंबीर बनूर राहा..., असं काहींनी तिला म्हटलं आहे. आम्ही तुझ्या सोबत आहोत, असं म्हणत अनेकांनी तिला धीर दिला आहे. ताईसाहेब, आपल्या स्वतंत्र बोलण्यानुसार राजकीय हेतूने आपल्याला तुरूंगात टाकले गेले होते... आम्हाला आपला अभिमान आहे. तुम्ही लढले आणि जिंकले तुरूंगातून बाहेर आले..., अशी कमेंट एका युजरने केली आहे.
केतकी चितळे हिने जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदाच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. ‘एखादी पोस्ट कॉपी पेस्ट करून फेसबुकवर शेअर केल्यानंतर इतका मोठा गुन्हा होतो का की तुम्ही थेट तुरुंगात टाकता, 41 दिवस तुम्ही त्या व्यक्तीपासून काढून घेता? मी काही चुकीचं केलं नाही, हे मला माहित आहे. त्यामुळे मी या गोष्टीचा सामना करू शकले,’ असं ती म्हणाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महिलांकडून आणि जमावाकडून मारहाण झाल्याचा आरोपही केतकीने या मुलाखतीत केला होता. ‘माज्या कानाखाली मारण्यात आलं, डोक्यात कुणीतरी जोरात टपली मारली आणि राइट ब्रेस्टवर पंच मारला. मी साडी नेसली होते. कुणीतरी धक्का दिला, पायात पाय घातल्यामुळे मी पोलिसांच्या गाडीत पडले. साडी देखील खेचण्यात आली. माझा पदर पडला होता, साडी वर गेली होती, माझा विनयभंग झाला.... इतके होऊनही अंगावर केमिकल रंग आणि अंडीदेखील फेकण्यात आली,’ असा आरोप तिने केला होता.