मराठी कलाविश्वाचा एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे किशोरी शहाणे. 'सगळीकडे बोंबाबोंब', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', 'दुर्गा झाली गौरी', 'मोरुची मावशी' अशा कितीतरी चित्रपट, नाटक आणि आता मालिकांच्या माध्यमातून किशोरी शहाणे (kishori shahane) प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. विशेष म्हणजे उत्तम अभिनयकौशल्याच्या जोरावर त्यांनी प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर राज्य केलं आहे. गेल्या काही काळापासून किशोरी यांचा हिंदी मालिकांमधील वावर वाढला आहे. परंतु, लवकरच त्या मराठी मालिकांकडे वळणार आहेत. तब्बल ६ वर्षांनी त्या मराठी मालिकेमध्ये पदार्पण करत आहेत.
काही काळापूर्वी किशोरी शहाणे बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोमध्ये झळकल्या होत्या. त्यानंतर त्या फारशा कुठे दिसल्या नाहीत. परंतु, आता लवकरच त्या एका गाजलेल्या मराठी मालिकेत दिसणार आहेत. या मालिकेत त्या प्लास्टिक सर्जनची भूमिका साकारणार आहेत.
सध्या छोट्या पडद्यावर पिंकीचा विजय असो ही मालिका लोकप्रिय ठरत आहे. याच मालिकेत किशोरी शहाणे झळकणार आहेत. येत्या भागात त्यांची मालिकेत एन्ट्री होणार आहे. गजराजने पिंकीचा खून केल्यानंतर पिंकीने जगाचा निरोप घेतला की काय असं सगळ्यांना वाटतं. परंतु, पिंकी एका नव्या रुपात मालिकेत येणार आहे. गजराज विरुद्ध पिंकीच्या या लढ्यात पुन्हा एकहा विजय पिंकीचाच होणार आहे.
पिंकीला हे नवं रुप दिलंय प्लास्टिक सर्जन देवयानी सदावर्ते यांनी. निसर्ग निर्मित प्रत्येक गोष्ट ही सुंदरच असते यावर देवयानी यांचा विश्वास आहे. अतिशय सकारात्मक आणि कोणत्याही वाईट गोष्टीत चांगलं शोधण्याची वृत्ती असणाऱ्या डॉ. देवयानी सदावर्ते पिंकीला तिच्या अपघातातून सावरतात आणि नवं जीवन आणि नवा चेहरा देतात. विशेष म्हणजे पिंकीला नवा चेहरा देणाऱ्या डॉ. देवयानी सदावर्ते यांची भूमिका किशोरी शहाणे साकारणार आहेत.
दरम्यान, जवळपास ६ वर्षांनंतर त्या मराठी मालिकेतून भेटीला येणार आहेत. स्टार प्रवाह या नंबर वन वाहिनीसोबत काम करताना अतिशय आनंद होत आहे. कोठारे व्हिजन्सची ही मालिका आहे त्यामुळे महेश कोठारे यांनी या भूमिकेसाठी विचारणा केली तेव्हा हे पात्र मला खूपच आवडलं आणि मी तातडीने होकार दिला. पिंकीचा विजय असो या मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. डॉ. शुभांगी सदावर्ते पिंकीला नवा चेहरा देतात. मला खात्री आहे मालिकेतलं आणि पिंकीच्या आयुष्यातलं हे नवं वळण प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असं किशोरी शहाणे म्हणाल्या.