Join us

बऱ्याच काळानंतर मनवा नाईकचं छोट्या पडद्यावर पुनरागमन; 'या' मालिकेत साकारतीये महत्त्वपूर्ण भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 11:33 AM

Manava naik: आजवर मनवाने अनेक मालिकांची निर्मिती केली. मात्र, आता इतक्या वर्षांनंतर ती पुन्हा एकदा तिच्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.

नाटक, मालिका आणि चित्रपट यांच्या माध्यमातून अनेकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री, निर्माती म्हणजे मनवा नाईक (Manava Naik).  गेल्या काही वर्षांपासून मनवाचा छोट्या पडद्यावरील वावर कमी झाला होता. अभिनयाऐवजी तिने निर्मिती क्षेत्राला प्रथम प्राधान्य दिलं. विशेष म्हणजे आजवर मनवाने अनेक मालिकांची निर्मिती केली. मात्र, आता इतक्या वर्षांनंतर ती पुन्हा एकदा तिच्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.

सोनी मराठीवरील ‘तुमची मुलगी काय करते’ (Tumchi Mulgi Kay Karte) या मालिकेच्या माध्यमातून मनवा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. या मालिकेत मनवा महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून नुकताच या मालिकेतील तिचा प्रोमो व्हायरल झाला आहे.

‘तुमची मुलगी काय करते’ ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न येत असून या रंजक वळणावरच मनवाची एन्ट्री झाली आहे. या मालिकेत मनवा डॉ. निलंजना वर्मा हे पात्र साकारत आहे.

काहीच दिवसांपूर्वी या मालिकेतील तिच्या पात्राचा प्रोमो सोनी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला होता. या प्रोमोमध्ये श्रद्धा मिरजकर म्हणजे सावनीच्या आईशी निलंजना बोलताना दिसत आहे. सावनीची तब्येत सुधारावी यासाठी निलंजना यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान, या मालिकेपूर्वी मनवा तुझं माझं जमेना या मालिकेत दिसली होती. मनवा उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच प्रसिद्ध निर्मातीदेखील आहे. मनवाच्या ‘स्ट्रॉबेरी पिक्चर्स’ या प्रोडक्शन हाऊसअंतर्गत अनेक मालिकांची निर्मिती करण्यात आली आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन