Marathi Serial Gotya : काही मालिका कायम स्मरणात राहतात. 90 च्या दशकातील प्रचंड गाजलेली ‘गोट्या’ (Gotya ) ही अशीच एक मालिका. दूरदर्शनवर ही मालिका प्रचंड गाजली. आत्ताच्या भाषेत सांगायचे तर हायेस्ट टीआरपी असलेली ही मालिका होती. गोट्या नावाचा एका निराधार मुलाला एक कुटुंब आधार देते. या नव्या घरात त्याला सुमा नावाची बहिण मिळते. गोट्या हुशार असतो, तितकाच चतूरही असतो. त्याच्या हुशारीचे किस्से मालिकेत सांगितले होते. जॉय घाणेकर या बालकलाकाने गोट्या साकारला होता. सुहास भालेकर, सविता मालपेकर, मानसी मागिकर, भैय्या उपासनी अशी बरीचशी कलाकार मंडळी या मालिकेत होती. सध्या ही मालिका आठवण्याचं कारण म्हणजे, गोट्या मालिकेतील माई. होय, ज्येष्ठ अभिनेत्री मानसी मागिकर (Manasi Magikar ) यांनी मालिकेत माईंची भूमिका साकारली होती. याच माईंनी ‘गोट्या’च्या काही आठवणींना उजाळा दिला आहे.
नुकतेच मानसी मागिकर यांनी सुलेखा तळवळकर यांच्या युट्युब चॅनलवरील मुलाखतीत गोट्या मालिकेच्या काही खास आठवणी सांगितल्या. राजदत्त यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘गोट्या’ मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. त्यांनीच मानसी मागिकर यांना माईंची भूमिका देऊ केली होती.
या भूमिकेबद्दल सांगताना मानसी म्हणाल्या, ‘गोट्या’ ही मालिका मढमध्येच शूट झाली आहे. सुतारवाडीच्या कोप-यावर एक जुनी बिल्डिंग होती, तिथेच कोकणी वातावरण होतं. गोट्याचं कथानक सगळ्यांना माहिती आहेच. त्यावेळी दूरदर्शनवर 13 च्या पटीत एपिसोड वाढवून मिळायचे आणि ‘गोट्या’ ही मालिका आठवड्यातून एकदाच प्रसारित व्हायची. 13 प्रमाणे ‘गोट्या’चे 26 भाग झालेत. त्यानंतर 39 भाग वाढवून मिळाले. मात्र 33 व्या एपिसोडला राजदत्त यांनी सांगितलं की ‘आता आणखी पाणी घालणं शक्य नाही’. आत्ताचं वातावरण बघितलं की मला फार गंमत वाटते. आजचा कुणी प्रोड्यूसर असं उत्तर देईल का? माझ्या मते, ही एक निष्ठा होती आपल्या कामावर. आपण मालिकेतून जे काही व्यक्तिचित्रण करतोय, त्याची मर्यादा त्यांना माहिती होती. उगीच आपलं दाखवायचं काहीतरी म्हणून त्यांनी ते केलं नाही. आपल्याला जो आशय पोहोचवायचा आहे, तो पोहोचवून झाला आहे. त्यामुळे इथेच थांबलं पाहिजे, ही जाणीच ठेवणं किती महत्त्वाचं आहे. खरं तर ही जाणीव ठेवणं अवघड आहे. उगाचच मालिकेच्या मूळ कथानकाला फाटा देऊन ती भरकटत नेण्यापेक्षा आणि प्रेक्षकांचाही अंत पाहण्यापेक्षा ही मालिका संपवणे त्यांनी अधिक पसंत केले होते.
मानसी मागिकर सध्या झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत दिसतात. का रे दुरावा, खुलता कळी खुलेना अशा मालिकांमधून त्या छोट्या पडद्यावर पाहायला मिळाल्या.