Join us

"माझ्या वाट्याला एवढी मोठी परीक्षा...", आयुष्यातील कठीण प्रसंगावर मयुरी देशमुख व्यक्त झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 14:22 IST

कठीण प्रसंगांतून मयुरी कशी बाहरे पडली? म्हणाली...

मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh) 'खुलता कळी खुलेना' मालिकेतून घराघरात पोहोचली. मयुरीने मालिका, नाटक आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. हिंदी मालिकेतही ती झळकली. तिच्या निरागसता, गोड दिसणं सगळ्यांनाच आवडतं. मयुरी प्रोफेशनल आयुष्यात यशाचं शिखर चढत असली तरी वैयक्तिक आयुष्यात तिने मोठा आघात सहन केला आहे. २०२० साली संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात असताना तिचा नवरा आशुतोष भाकरेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. यामुळे मयुरी बराच काळ धक्क्यात होती. नुकतंच तिने एका मुलाखतीत कठीण प्रसंगातून बाहेर कशी पडली यावर भाष्य केलं आहे.

'दिल के करीब'ला दिलेल्या मुलाखतीत मयुरी देशमुख म्हणाली, "मुळात मी एकटीने सगळं हँडल केलं असं नाही. अनेकांनी मला मदत केली. तसंच मी कायम सकारात्मक राहते हा माझा दृष्टिकोन असतोच. देवाला माहित असतं की आपल्यात किती क्षमता आहे. आपण कुठल्या प्रसंगातून बाहेर पडू शकू. आपल्यात केवढी शक्ती आहे. तशाच पद्धतीची परीक्षा तो तुम्हाला देतो. त्यावेळी साहजिक आपल्याला वाटतं की अरे हा अन्याय आहे. माझ्याच वाट्याला एवढी मोठी परिक्षा का?"

ती पुढे म्हणाली, "पण त्याचवेळी देवाने माझ्या आजूबाजूला खूप छान लोकं पेरली होती. मला त्याचक्षणी वाटलं होतं की मला उंच डोंगरावरुन कोणीतरी खाली दरीत ढकललं आहे. खाली पडताना वाटणारी भीती किंवा हतबलता ते सगळं मी अनुभवलं. पण खाली एक जाळी होती. मी त्या जाळीवर पडले. त्यामुळे मला लागलं नाही पण मी ते पडणं अनुभवलं. मला वाटतं ती जाळी म्हणजे दैवी शक्ती होती असं म्हणूया. मित्र परिवार, कुटुंबाच्या रुपात ती शक्ती माझ्यासोबत होती."

मयुरी देशमुख गेल्या वर्षी 'इमली' या हिंदी मालिकेत झळकली. तर 'मन धागा धागा जोडते नवा' या मराठी मालिकेतही तिने काम केलं. 'डिअर आजो' या नाटकाचे प्रयोगही तिने केले. 

टॅग्स :मयुरी देशमुखमराठी अभिनेताटेलिव्हिजन