'माझिया प्रियाला प्रीत कळेना' मधून प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडणारी अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) 4 वर्षांनंतर भारतात परतली आहे. पती आणि लेकीसोबत ती अमेरिकेत स्थायिक झाली होती. मात्र आता जन्मभूमी नाशिकमधला फोटो पोस्ट करत तिने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली. तसंच मृणाल आता भारतातच राहणार असून पुन्हा कामही सुरु करणार आहे. याविषयी ती काय म्हणाली वाचा.
'माझिया प्रियाला प्रीत कळेना','तू तिथे मी' या मालिकांमधून मृणाल दुसानिस घराघरात पोहोचली. 2018 साली आलेली 'हे मन बावरे' ही तिची शेवटची मालिका. ही मालिका संपेपर्यंत ती लग्न करुन अमेरिकेला स्थायिक झाली. तिने नुर्वी या गोंडस मुलीला जन्म दिला. आता मृणाल पती आणि लेकीसह तब्बल ४ वर्षांनी भारतात आली आहे. नाशिकमधील गोदाकाठ येथे सेल्फी शेअर करत तिने ही गुडन्यूज दिली. आता पुढील प्लॅनविषयी एबीपी माझाशी बोलताना ती म्हणाली, "इतक्या वर्षांनी पुन्हा मायदेशी परतल्यानंतर खूप आनंद होतोय. आता मी भारतातच राहणार आहे. माजी मुलगी नूर्वी दीडच वर्षांची आहे. ती तर पहिल्यांदाच भारतात आली आहे. माझी जन्मभूमी नाशिकमध्ये लेकीला फिरवताना मला खूप मजा आली. नूर्वीला पाणी बघायला खूप आवडतं. म्हणून आम्ही छान नदीकाठी बसलो, फोटो काढले."
श्रेया बुगडे, सुकन्या मोने, नम्रता आवटे या अभिनेत्रींनी तिच्या पोस्टवर कमेंट करत तिचं स्वागत केलं आहे. मृणालला पुन्हा काम करताना बघायची सर्वांचीच इच्छा आहे.