मराठी तसंच हिंदी मालिका, सिनेमांमध्ये दिसलेली अभिनेत्री मुग्धा चाफेकर (Mugdha Chaphekar) घटस्फोट घेत आहे. पती रवीश देसाईपासून (Ravish Desai) तिने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नानंतर ९ वर्षांनी ही जोडी कायमची वेगळी होत आहे. मालिकेच्या सेटवरची ओळख, प्रेम आणि नंतर लग्न असा त्यांचा एकत्रित सुंदर प्रवास इथेच थांबला आहे. मुग्धाचा पती अभिनेता रवीश देसाईने सोशल मीडियावर पोस्ट करत घटस्फोटाची माहिती दिली आहे.
मुग्धा चाफेकर आणि रवीश देसाई यांची २०१४ साली 'सप्तरंगी ससुराल' मालिकेच्या सेटवर ओळख झाली. याचदरम्यान त्यांच्यात प्रेम फुललं. दोन वर्षात २०१६ साली जानेवारी महिन्यात त्यांनी साखरपुडा केला. तर त्यावर्षी डिसेंबर महिन्यात दोघं लग्नबंधनात अडकले. ९ वर्षांचा संसार केल्यानंतर आता ते वेगळे होत आहेत. रवीश देसाईने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले, "मी आणि मुग्धाने बराच विचारविनिमय केल्यानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही नवरा बायको या नात्यातून मुक्त होत आपापल्या मार्गावर जात आहोत. आमचा एकत्रित प्रवास अतिशय सुंदर राहिला. यामध्ये प्रेम, मैत्री आणि एकमेकांसाठी आदर होता जो यापुढेही आयुष्यभर राहील. आमची सर्व चाहते, हितचिंतक आणि माध्यमांना विनंती आहे की या कठीण काळात आम्हाला कृपया प्रायव्हसी द्या. कोणत्याही चुकीच्या गोष्टी, अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमचं प्रेम आणि पाठिंब्यासाठी खूप आभार."
कोण आहे मुग्धा चाफेकर?
अभिनेत्री मुग्धा चाफेकर 'धरती कका वीर योद्धा पृथ्वीराज चौहान' मालिकेतील संयोगिता भूमिकेमुळे ओळखली जाते. तसंच ती 'कुमकुम भाग्य' मालिकेतही झळकली. 'सजन रे झूठ मत बोलो','गोलमाल है भाई सब गोलमाल है','सप्तरंगी ससुराल' या हिंदी मालिकांमध्ये दिसली. २०१८ साली मुग्धाने 'गुलमोहर' मालिकेतून मराठी टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केलं. तर २०२२ साली ती 'रुप नगर के चीते' या मराठी सिनेमातही दिसली.
मुग्धाचा पूर्व पती रवीश देसाई सुद्धा अभिनेता आहे.'she','स्कूप' या गाजलेल्या सीरिजमध्ये तो झळकला. अनन्या पांडेच्या CTRL सिनेमातही तो होता.