'मन उधाण वाऱ्याचे' मालिका आठवतेय का? २००९ ते २०११ दोन वर्ष ही मालिका चालली. अभिनेत्री नेहा गद्रे (Neha Gadre) या मालिकेतून घराघरात पोहोचली होती. नेहा लग्नानंतर गेल्या काही वर्षांपासून ऑस्ट्रेलियात असून तिने आता नुकतंच मुलाला जन्म दिला आहे. तिचा नवरा ईशान बापटने पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. नेहाने आणि ईशानने पोस्टमधून लेकाचं नावही सांगितलं आहे.
अभिनेत्री नेहा गद्रे गेल्या काही महिन्यांपासून प्रेग्नंसीमुळे चर्चेत होती. २०१९ साली तिने ईशान बापटशी लग्नगाठ बांधली आणि ते ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. नेहाचं दोन महिन्यांपूर्वी डोहाळजेवण पार पडलं होतं त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शिवाय तिच्या मॅटर्निटी फोटोशूटचीही खूप चर्चा झाली होती. १० फेब्रुवारी रोजी नेहाला मुलगा झाला. त्याचं नाव इवान असं ठेवण्यात आलं आहे. ईशान बापटने अॅनिमिटेड पोस्ट करत 'बेबी इवानचं या जगात स्वागत आहे' असं लिहिलं आहे. सोबतच १० फेब्रुवारी २०२५ अशी तारीखही लिहिली आहे.
नेहा गद्रेवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. लग्नानंतर ६ वर्षांनी ती आई झाली आहे. वयाच्या ३५ व्या वर्षी तिने मुलाला जन्म दिला. त्यामुळे दोन्ही कुटुंबात आता आनंदाचं वातावरण आहे. नेहा आणि ईशान कुटुंबासह ऑस्ट्रेलियातील न्यूजस्टेड भागात राहतात. तिथेच नेहाचं डोहाळजेवणही झालं होतं ज्याला अभिनेत्री सुकन्या मोने यांनीही हजेरी लावली होती. आता नेहा आणि ईशान आईबाबा झाले असून त्यांच्या आयुष्याचा पुढील टप्पा सुरु झाला आहे.
नेहा गद्रे 'मन उधाण वाऱ्याचे' शिवाय'अजूनही चांदरात आहे' मालिकेतही झळकली. यासोबतच तिने 'मोकळा श्वास' सिनेमात काम केलं. यानंतर २०१९ मध्ये लग्न झाल्यावर ती संसारात रमली.