स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'पिंकीचा विजय असो'काही महिन्यांपूर्वीच संपली. दोन वर्ष ही मालिका चालली. अभिनेत्री शरयू सोनवणे आणि अभिनेता विजय अंदाळकर यांची मालिकेत मुख्य भूमिका होती. पिंकीच्या भूमिकेतील शरयू सर्वांनाच आवडली होती. पण शरयूच्या आधी या भूमिकेसाठी दुसऱ्याच अभिनेत्रीची निवड झाली होती. ती अभिनेत्री म्हणजे सध्या गाजत असलेल्या 'मुरांबा' मधली रेवा म्हणजेच निशानी बोरुले (Nishhani Borule). निशानीला मालिकेतून ऐनवेळी रिप्लेस करण्यात आलं होतं असा खुलासा तिने नुकताच केला आहे.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत निशानी म्हणाली, "मला आधीपासूनच सकारात्मक भूमिका साकारायची होती. ऑडिशन देत असताना माझी 'पिंकीचा विजय असो' मालिकेसाठी निवड झाली होती. मलाही ती भूमिका खूप आवडली होती. 'निमकी मुखिया' या हिंदी मालिकेचीच ही रिमेक असणार होती. मी त्या मालिकेचे २०० एपिसोड्स पाहिले. मला ते कॅरेक्टर खूप आवडलं होतं. बबली, जगाचा विचार न करणारी अशी ती होती. ती भूमिका करायला खूप मजा येणार होती. मकरंद अनासपुरे त्यात माझे वडील असणार होते. माझे वर्कशॉपही झाले. अहमदनगरची भाषा होती. मी तिथल्या स्थानिक भाषेचा लहेजा शिकण्यासाठी ट्रेनिंगही घेतलं होतं. माझे जवळजवळ १२ ते १४ एपिसोड्स तोंडपाठ झाले होते. सीन कसा करायचा याचा माझा अभ्यासही झाला होता. प्रोडक्शनबरोबर करार झाला होता. लूक टेस्टही झाली होती. चॅनलला खूप आवडली होती."
ती पुढे म्हणाली, "इतकं सगळं झाल्यावर जेव्हा आम्ही खरं काम सुरु करणार त्यावेळी जेव्हा मला कळलं की निर्मातेच बदलत आहेत. त्यांनी अभिनेत्रीच बदलायचं ठरवलं आहे आणि मी रिप्लेस होणार आहे. आपल्याजागी कोणीतरी दुसरी अभिनेत्री काम करणार आहे हे कळलं तेव्हा वाईट वाटलं. मी या मालिकेच्या तयारीसाठी इतका वेळ दिला होता. माझ्यासाठी ती भूमिकाही महत्वाची होती. मी खूप आनंदात काम करत होते. तेव्हा मला थोडं डिप्रेशन आलं होतं."
Exclusive: 'मुरांबा'मधल्या 'रेवा'चा खुलासा; म्हणाली, "खलनायिका साकारायची इच्छा नव्हती पण..."
निशानीला आधीपासूनच सकारात्मक भूमिका करायच्या होत्या. मात्र पिंकीचा विजय असो मधून रिप्लेस केल्यानंतर तिने 'मुरांबा'मध्ये खलनायिकेचं पात्र स्वीकारलं. तरी तिला या भूमिकेसाठी प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं. यावरुनच जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असंही निशानी म्हणाली.