सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं जात आहे. घरोघरी गुढी उभारून हिंदू नववर्षाचा हा पहिला दिवस साजरा केला जातो. गुढीपाडव्यानिमित्त ठिकठिकाणी शोभायात्राही काढल्या जातात. या शोभायात्रेत मराठी कलाकारही मोठ्या उत्साहाने सहभागी होताना दिसतात. गुढीपाडव्यानिमित्त नागपुरात काढलेल्या शोभायात्रेत मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीही सहभागी झाली होती. यावेळी तिने प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतानाच येऊ घातलेल्या निवडणुकांबद्दलही भाष्य केलं.
"तुम्हाला सगळ्यांना हिंदूनववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. हिंदू नववर्षाचं स्वागत खरंच उत्साहात, जल्लोषात झालं पाहिजे. इतक्या सकाळी हिंदू जनता नववर्षाचं स्वागत करण्यासाठी नटून थटून जमली आहे. सनातन धर्म हा हजारो वर्षांपासून चालत आलेला आहे. आज सूर्य चंद्र मेष राशीत प्रवेश करतात. निसर्गचक्रानुसार आज खऱ्या अर्थाने नववर्षाला सुरुवात होते. आणि तेच आपणही फॉलो करतो. नव्या वर्षात खूप काम करायचं आहे, प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं आहे, हाच संकल्प आहे," असं प्राजक्ता एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.
गुढीपाडव्याचा मुहुर्त साधत काही राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारालाही सुरुवात केली आहे. "लोकसभेच्या निवडणुकांबाबत मतदारांना काय आवाहन कराल?" असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर प्राजक्ता म्हणाली, "मतदारांना हेच सांगायचं आहे की मतदान करा. सुट्टी घेऊन गायब होऊ नका. नोटाला मत देऊ नका. कोणाला तरी मत द्या. अभ्यास करा...माहिती करून घ्या. मतदानाच्या दिवशी सुट्टी घेऊन फिरायला जाण्याचे भोग आपण नंतर भोगतो. त्यामुळे अशी माती खाऊ नका. अभ्यासपूर्वक आणि विचारपूर्वक मतदान करा. सध्या महाराष्ट्रातील अवस्था पाहता आपण सगळ्यांनी जागरुक राहणं महत्त्वाचं आहे."