गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्राजक्ता माळी चर्चेत आहे. फुलवंती सिनेमानंतर प्राजक्ता भाजपा आमदार सुरेश धस यांनी केलेल्या विधानामुळे चर्चेत आली होती. सुरेश धस यांच्या आरोपांवर प्राजक्ताने पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं होतं. फुलवंतीच्या सक्सेसनंतर प्राजक्ता देशातील १२ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला गेली होती. आता पत्रकार परिषदेनंतर तिने पुन्हा या यात्रेला सुरुवात केली आहे.
प्राजक्ताचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. करिअर आणि वैयक्तिक जीवनातील अपडेट्स ती चाहत्यांना देत असते. फुलवंतीच्या यशानंतर १२ ज्योतिर्लिंगाची यात्रा प्राजक्ता करते आहे. आत्तापर्यंत तिने सोमनाथ ज्योतिर्लिंग(गुजरात),श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग (द्वारका , गुजरात), श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग (मध्य प्रदेश), श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग (उज्जैन) या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं आहे. याचे फोटो प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.
आता प्राजक्ताने महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. येथील शिवमंदिराला भेट देत अभिनेत्री नतमस्तक झालेली पाहायला मिळाली. याचे फोटो अभिनेत्रीने शिवज्योतिर्लिंग यात्रेला पुन्हा सुरुवात केल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, प्राजक्ता ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्राजक्ताने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'फुलवंती' या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या सिनेमात प्राजक्ताने मुख्य भूमिका साकारली. तर या सिनेमाच्या निमित्ताने प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकलं आहे.