Join us

“आज ३ तारीख, उद्यापासून.."; प्राजक्ता माळीने राज ठाकरे यांच्याविषयीची 'ती' पोस्ट केली एडिट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2022 1:01 PM

Prajakta Mali: प्राजक्ताने नुकतीच इन्स्टाग्रामवर राज ठाकरे यांच्याविषयी एक पोस्ट शेअर केली होती. मात्र, काही काळातच तिने ही पोस्ट एडिट केली.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. अलिकडेच तिने मनसेच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावली होती. त्यावेळी प्राजक्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. या चर्चांवर प्राजक्ताने स्पष्टीकरणही दिलं होतं. मात्र, आता प्राजक्ता पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्यामुळे चर्चेत आली आहे. प्राजक्ताने नुकतीच इन्स्टाग्रामवर राज ठाकरे यांच्याविषयी एक पोस्ट शेअर केली होती. मात्र, काही काळातच तिने ही पोस्ट एडिट केली.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या आणि ईदच्या शुभेच्छा देत १ मे रोजी राज ठाकरेंनी दिलेल्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे.  मात्र, ही पोस्ट तिने काही काळातच एडिट केली. इतकंच नाही तर, या पोस्टमधील राज ठाकरे यांच्या भाषणावरील तिची प्रतिक्रिया तिने डिलीट केली असून या पोस्टमध्ये आता केवळ अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा वर ईदच्या शुभेच्छाच दिसून येत आहेत.

काय आहे प्राजक्ताची सध्याची पोस्ट?

प्राजक्ताने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने प्रचंड सोन्याचे दागिने परिधान केले आहेत. सोबतच दुसऱ्या फोटोमध्ये तिने वर्तमानपत्रात असलेल्या एका लेखाचा फोटो शेअर केला आहे. या लेखात मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे उतरवण्याचे आदेश हायकोर्टाने सरकारला दिल्याचं दिसून येत आहे.

काय होती प्राजक्ताची मूळ पोस्ट?

 “सगळ्यांचं सुख, समाधान, ऐश्वर्य अक्षय्य राहो, हीच प्रार्थना. सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या तसेच मुस्लिम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा. (आज सोनं खरेदीचा दिवस म्हणून अंगावर सर्वाधिक सोनं असलेला फोटो टाकतेय.)”, असं प्राजक्ताने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पुढे ती म्हणते, “असो…आज ३ तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा बाळगते. #शांतताप्रिय #त्रस्तनागरिक धन्यवाद… मा. श्री. राज ठाकरे (Raj Thackeray) सगळ्याचसाठी…परवाच्या संभाजीनगर सभेतील हिंदूच्या- महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलचं तुमचं भाषण ऐकून; ऊर अभिमानानं भरून आला, अंगावर स्फुरण चढलं, नवचेतना जागृत झाली. हल्ली अशा प्रकारे समाजाला शहाणं करण्यासाठी कोण झटत..? खूप धन्यवाद”, असे कॅप्शन तिने दिले आहे.

दरम्यान, प्राजक्ताने या पोस्टमधील राज ठाकरे यांच्या भाषणांचा उल्लेख डिलीट केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या नव्या पोस्टची चर्चा रंगली आहे. मात्र, तिने ही पोस्ट नेमकी का एडिट केली हे मात्र, अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

टॅग्स :राज ठाकरेप्राजक्ता माळीटेलिव्हिजनअक्षय्य तृतीया