मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी ( prajakta mali). आपल्या मनमोहक सौंदर्य आणि दिलखेचक अदांमुळे प्राजक्ताने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं. गेल्या काही काळात प्राजक्ताचा कलाविश्वातील वावर प्रचंड वाढला आहे. सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसून येत आहे. हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय असून त्यातील कलाकारही प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. विशेष म्हणजे या कार्यक्रमात असा एक अभिनेता आहे जो प्राजक्तालाही आवडत असून तिने त्याच्याविषयी भाष्य केलं आहे.
सध्या सोशल मीडियावर प्राजक्ताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने महाराष्ट्राची हास्यजत्रामधील तिला आवडणाऱ्या कलाकाराविषयी सांगितलं आहे. हा व्हिडीओ प्राजक्ताच्या एक फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात तुला सर्वात जास्त कोण आवडतं? असा प्रश्न प्राजक्ताला विचारण्यात आला होता. त्यावर प्राजक्ताने या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराचं कौतुक केलं. मात्र, एक कलाकार तिला प्रचंड आवडतो असं सांगितलं.
इंडस्ट्रीत येण्यापूर्वी कशी दिसायची प्राजक्ता माळी; पाहा तिचे जुने निवडक फोटो
' या कार्यक्रमातील सगळेच खूप भारी आहेत. असा एकच कोणी फेव्हरेट किंवा कमालीचा आहे असं म्हणणं चुकीचं आहे. कारण सगळ्यांची वैशिष्ट्य आणि परफॉर्मन्स स्टाइल वेगळी आहे, प्रत्येकाचा ह्युमर वेगळा आहे. मुळात सगळे माझे जिगरी दोस्त आहेत,' असं प्राजक्ता म्हणाली.
पुढे ती म्हणते, 'मी त्याच्याविषयीचं प्रेम लपवू शकत नाही. 'वाह दादा वाह' समीर चौघुले ही माझा सर्वात आवडती व्यक्ती आहे. कलाकार म्हणून तो तर तो कमाल आहे, पण माणूस म्हणून तो खरंच खूप कमाल आहे. तो मराठीतील चार्ली चॅप्लिन वाटतो. त्याच्या रिअॅक्शन, त्याचे विनोद प्राजक्ता म्हणून मला जास्त आवडतं. सीनिअर फळीत तो आहे, तर ज्युनिअर सगळेच कमाल आहेत. मी त्यांच्यात निवडू शकत नाही. 'ओंकार भोजने, गौरव मोरे, वनिता खरात, शिवाली परब हे मला आश्चर्यचकित करतात. त्यांच्याकडून मी काहीतरी शिकते.
दरम्यान, प्राजक्ताने गेल्या काही काळामध्ये कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्री असण्यासोबतच प्राजक्ता व्यावसायिकदेखील आहे. प्राजक्तराज हा प्राजक्ताचा स्वत:चा दागिण्यांचा ब्रँड आहे.